‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था

(नीट (NEET) – नॅशनल एलिजिबिलिटी अँड एन्ट्रन्स एक्झामिनेशन – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)

पणजी, १९ जून (वार्ता.) – वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी ‘नीट’ परीक्षा इतर राज्यांसहित गोव्यात २१ जून २०२६ या दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी गोव्यात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, भ्रमणभाष जॅमर्स (वापर बंद करणारे उपकरण) बसवण्यात येतील. प्रश्नपत्रिका आणण्यासाठी आणि परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका पोचवण्यासाठी पोलिसांसहित केंद्रीय सुरक्षादलाच्या सैनिकांचे साहाय्य घेण्यात येणार आहे. अशा कडक सुरक्षाव्यवस्थेत ही परीक्षा होणार, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी दिली आहे. ही सुरक्षाव्यवस्था सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार असेल. जिल्हाधिकार्‍यांकडून परीक्षेसाठी व्यवस्था आणि सुरक्षा यांचा आढावा घेतला जात आहे. परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे आणि भ्रमणभाष जॅमर्स असल्यामुळे विद्यार्थी अन् कर्मचारी यांना भ्रमणभाषवरून संपर्क साधता येणार नाही.

परीक्षांसाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील केंद्रे

नीट परीक्षेसाठी उत्तर गोव्यात ८ आणि दक्षिण गोव्यात ४ केंद्रांमध्ये परीक्षा होणार आहे. उत्तर गोव्यात सेंट झेवियर महाविद्यालय, म्हापसा; संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय,पेडणे; सरकारी महाविद्यालय, सांखळी; रोझरी हायस्कूल, कुजिरा, बांबोळी; धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय, कुजिरा, बांबोळी; केंद्रीय विद्यालय, आय.एन्.एस्. मांडवी; केंद्रीय विद्यालय, बांबोळी ही केंद्रे असतील. दक्षिण गोव्यात केंद्रीय विद्यालय, कुर्टी, फोंडा; एन्आयटी, कुंकळ्ळी; केंद्रीय विद्यालय १, वर्णपुरी; केंद्रीय विद्यालय २ मांगोरहील या ठिकाणी परीक्षा होणार आहेत. उत्तर गोव्यात एकूण ३ सहस्र ३५० विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून दक्षिण गोव्यात एकूण १ सहस्र ७० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. नीट परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, नर्सिंग, होमिओपॅथी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत पोचावे, यासाठी विद्यार्थ्यांसाठी कदंब बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. गेल्या वेळी नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने ही फेरपरीक्षा घेतली जात आहे.