Bengaluru SIR : बेंगळुरूत ९७ लाखांपैकी ४ लाख मतदार अवैध!

  • कर्नाटकात विशेष पुनरावलोकन प्रक्रियेत उघड झाली माहिती

  • एकाच व्यक्तीचे नाव अन्य मतदारसंघात असल्याची (दुबार मतदारांची) ही आकडेवारी

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरात चालू असलेल्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेत४ लाख अवैध असल्याची माहिती उघड झाली. काही मतदारांकडे एकापेक्षा अधिक ठिकाणचे मतदार ओळखपत्र (दुबार मतदार) असल्याच आढळून आले. कर्नाटकासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश येथे तिसर्‍या टप्प्यातील पुनरावलोकन प्रक्रिया चालू असून राज्यातील लाखो मतदानकेंद्र पातळीवरील अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करत आहेत.

१. प्रक्रियेची व्याप्ती : निवडणूक अधिकार्‍यांच्या आकडेवारीनुसार ग्रेटर बेंगळुरू क्षेत्रातील ५ महानगरपालिकांच्या २८ विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुमाने ९७ लाख मतदार आहेत.

२. अन्य जिल्ह्यात अथवा राज्यातही नावे : यांपैकी ४ लाख लोकांची नावे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या किंवा इतर राज्यांच्या मतदार सूचीतही असल्याचे आढळून आले आहे.

३. एकाच मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी नावे : याखेरीज अनुमाने ११ सहस्र लोकांची नावे एकाच विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याचेही समोर आले आहे.

काय सांगतो नियम ?

नियमानुसार एका मतदाराचे नाव देशात केवळ एकाच मतदान केंद्रात असले पाहिजे. त्यामुळे मतदारांनी शेवटी मतदान केलेल्या किंवा सध्या रहात असलेल्या ठिकाणाच्या आधारे एक नाव कायम ठेवून उर्वरित नोंदी काढून टाकल्या जातील, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

मतदार सूचीच्या शुद्धीकरणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि बनावट अन् दुबार मतदानाला आळा बसेल, असे अधिकार्‍यांचे मत आहे.

बेंगळुरूतील यशवंतपूरमध्ये सर्वाधिक प्रकरणे !

एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदानाचा अधिकार असलेल्यांची संख्या यशवंतपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. यासमवेतच आर्.आर्. नगर, शिवाजीनगर, शांतिनगर, गांधीनगर, राजाजीनगर, चामराजपेट, चिकपेठ, के.आर्. पूरम, महालक्ष्मी लेआऊट, मल्लेश्वरम्, हेब्बाळ, पुलकेशीनगर, सर्वज्ञनगर, सी.व्ही. रामन नगर, गोविंदराजनगर, विजयनगर, बसवनगुडी, पद्मनाभनगर, बीटीएम् लेआऊट, जयनगर, बोम्मनहळ्ळी, येलहंका, ब्याटरायनपुरा, दासरहळ्ळी, महादेवपुरा, बेंगळुरू दक्षिण अशा अनेक मतदारसंघांमध्येही दुबार मतदारांची नावे आढळून आली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.

विशेष पुनरावलोकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये ‘मसुदा मतदार सूची’ प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवून त्यांची पडताळणी केली जाईल. जानेवारी २०२७ मध्ये अंतिम मतदार सूची प्रसिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे नियोजन आहे.

संपादकीय भूमिका

यासमवेत बेंगळुरूत बांगलादेशी घुसखोरही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याची माहिती वेळोवेळी समोर आली आहे. कर्नाटकात घुसखोरप्रेमींचे सरकार असल्याने निवडणूक आयोगाने सतर्क होऊन घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !