Kanpur Petrol Scam : चारचाकीतील इंधन टाकीची क्षमता ४५ लिटर असतांना त्यात ५२ लिटर पेट्रोल भरले !

कानपूर येथे एका चारचाकी मालकाकडून पेट्रोल पंपावरील घोटाळा उघडकीस !

वाहनमालक चरण सिंह आपल्या बीलासह

कानपूर (उत्तरप्रदेश) – एका चारचाकी वाहनातील इंधनाच्या टाकीची क्षमता ४५ लिटर असतांना पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याने ५२ लिटर पेट्रोल भरल्याचे देयक वाहनाच्या मालकाला दिल्याची घटना घडली. मालकाने हे देयक सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत पेट्रोल पंपावरील घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या पेट्रोल पंपाचे अन्वेषण करण्याचे आदेश दिले.

वाहनमालक चरण सिंह यांनी नुकतेच नवे चारचाकी वाहन घेतले होते. वाहनात पेट्रोल अल्प असल्याने ते पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले आणि त्यांनी तेथील कर्मचार्‍याला संपूर्ण टाकी भरण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचार्‍याने चरण सिंह यांना ५२ लिटर पेट्रोल भरल्याचे देयक दिले. हे देयक वाचून सिंह यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पेट्रोल पंपावरील कार्यालयात दाद मागितली.

याविषयी माहिती देतांना चरण सिंह म्हणाले,

‘‘पेट्रोल भरणारा कर्मचारी आरंभी ४१ लिटर पेट्रोल भरून थांबला. मी त्याला याविषयी विचारले असता त्याने ‘अधिक प्रमाणात  इंधन असल्याने ते दोन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये भरावे लागते’, असे सांगितले. त्यानंतर त्याने यंत्रामध्ये फेरफार करून आणखी ११ लिटर पेट्रोल टाकले. हा घोटाळा असल्याचा संशय आल्याने सिंह यांनी थेट उत्पादक आस्थापनाच्या प्रतिनिधीला घटनास्थळी बोलावले. आस्थापनाचे अधिकारी आले आणि त्यांनी औपचारिकपणे स्पष्ट केले की, वाहनाच्या टाकीत कोणत्याही परिस्थितीत ४५ लिटरपेक्षा अधिक इंधन मावू शकत नाही. तरीही पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाने त्यांची काहीही चूक नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंततः मी पोलिसांत तक्रार केली.’’ यानंतर जिल्हा प्रशसनानेही या घटनेचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

सहस्रो लोकांना पेट्रोल पंपांवर असे अनुभव नित्य येत असतात. सरकारने अशा घोटाळ्यांना रोखण्यासाठी आता जनतेने सरकारवर दबाव आणला पाहिजे !