बर्च बाय रोमिओ लेन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून ११ कोटी १ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

पणजी, २८ मे (वार्ता.) – अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) पणजी विभागीय कार्यालयाने हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’च्या अवैध संचालनाच्या अन्वेषणाच्या संदर्भात मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत ११ कोटी १ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण जप्ती आणि गोठवण्याची रक्कम अंदाजे २९ कोटी ५ लाख रुपयांवर पोचली आहे.

हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ या दिवशी झालेल्या आगीच्या दुर्घटनेशी संबंधित प्रथमदर्शी अहवालातून हे अन्वेषण चालू झाले आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले. त्याचप्रमाणे संमती मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या आरोपांमधूनही हे अन्वेषण चालू झाले आहे. याविषयी अंमलबजावणी संचालनालयाने  दिलेल्या माहितीनुसार ‘बर्च बाय रोमिओ लेन’ ही संस्था अग्नीशमन खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर अनिवार्य अनुमतींविना कार्यरत होती आणि मार्च २०२४ मध्ये व्यापार अनुज्ञप्ती संपलेली असूनही त्यांनी व्यवसाय चालू ठेवला होता. या संस्थेने आर्थिक वर्ष २०२३-२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत अंदाजे २९ कोटी ७८ लाख रुपयांचा महसूल मिळवला. हा पैसा आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगारीतून मिळालेला पैसा म्हणून ओळखला गेला आहे. यापूर्वी २३ जानेवारी २०२६ या दिवशी संबंधित ठिकाणांवर घातलेल्या धाडींमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती आणि अनुमाने ५९ लाख रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वी १७ कोटी ४५ लाख रुपयांचा तात्पुरता जप्ती आदेशही काढण्यात आला होता.