कोथरूड (पुणे) येथे ‘दत्तयागा’च्या प्रथम दिवशी विविध राज्यांतील वेदज्ञ ब्राह्मण सहभागी !

अमळनेरकर महाराज सेवा संघ, पुणे आयोजित दत्तयागाचा भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !

श्री दत्तयागाचा संकल्प करतांना विविध भक्तगण

पुणे, २८ मे (वार्ता.) – पुरुषोत्तम मासानिमित्त कोथरूड येथील ‘श्री शिवसमर्थ हॉल’ येथे आयोजित करण्यात आलेल्या नऊ कुंडीय दत्तयागास २८ मे या दिवशी मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. या दत्तयागासाठी विविध राज्यांतील वेदज्ञ ब्राह्मण सहभागी झाले असून संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे. अमळनेरकर महाराज सेवा संघ, पुणे यांच्या वतीने आयोजित या यज्ञ सोहळ्यास सकाळपासून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थित लाभली. या ठिकाणी ९ यज्ञकुंडे स्थापित करण्यात आली असून प्रथम दिवशी एकूण ४० जणांनी सपत्नीक यज्ञासाठी यजमानपद स्वीकारत दत्तयागाचा संकल्प केला. प्रतिदिन ४० जणांना सपत्नीक यागाचे यजमानपद म्हणून सहभागी होता येणार आहे. ३० मेपर्यंत हा याग होणार आहे. यज्ञाला ६०० हून अधिक उपस्थिती होती.

यज्ञस्थळाची वैशिष्ट्ये आणि विठ्ठलभक्तीचा सोहळा !

प.पू. प्रसाद महाराज यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करतांना

यज्ञस्थळी बांबूची यज्ञवेदी करण्यात आली असून त्याच्या चारही बाजूंच्या ४ द्वारांना चतुर्वेदांची नावे देण्यात आली होती. द्वारांच्या चौकटीवर शंख, गदा, पद्म, वज्र, त्रिशूळ अशी दैवी चिन्हे काढली आहेत. आंब्याची पाने आणि फुलांची तोरणे, तसेच भगवे ध्वज यांची सजावट केल्यामुळे तेथील वातावरणात सगळीकडे सात्त्विकता निर्माण झाली आहे. प.पू. प्रसाद महाराज आणि पुरोहित यांनी यज्ञासाठी अग्निमंथन करून अग्नी प्रज्वलित केला. प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी त्यांच्यासमवेत पांडुरंगाची पूजेतील मूर्ती आणली होती. या पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा आणि आरती अमळनेरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी भक्तांनी भजन म्हटले.

गुरुकृपेची ‘भागीरथी’ !

भक्तगणांवर तीर्थ सिंचन करतांना प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर

आरती झाल्यावर महाराज यांनी त्यांच्या पंचपात्रातील तीर्थाचे सर्व भक्तगणांवर सिंचन केले. त्या वेळी ‘हर गंगे भागीरथी’ असा भक्तांनी जयघोष केला. प्रसादरूपाने सर्वांना तीर्थ, पंचामृत, पेढा आणि फळे यांचे वाटप करण्यात आले. यानंतर भक्तगणांनी वायनदान (अधिक मासानिमित्त केलेले संकल्पयुक्त दान) केले. यानंतर सर्व भक्तांनी प.पू. प्रसाद महाराज यांचे दर्शन घेतले.

प.पू. प्रसाद महाराज यांची साखरेची तुला

क्षणचित्रे : प.पू. प्रसाद महाराज यांची साखर आणि धान्य यांनी तुला करण्यात आली.

पुरुषोत्तम मासात यज्ञ आणि याग करण्याचे महत्त्व !

एक भक्त श्री. संजय बंगाली यांनी यज्ञ आणि याग करण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘‘यज्ञ आणि याग करण्यामागे सखोल आध्यात्मिक अन् शास्त्रीय कारणे आहेत. ‘ज्या देवतेचा याग केला जातो, तिचे तिथे आवाहन केले जाते आणि समर्थ सद्गुरूंच्या सान्निध्यात हा सोहळा होत असतांना ती देवता तिथे प्रत्यक्ष उपस्थित असते’, अशी भक्तांची श्रद्धा असते. यागामध्ये होणारे पवित्र मंत्रोच्चार आणि विशिष्ट सामुग्रीचे हवन यांमुळे अद्भुत ऊर्जा निर्माण होते, ज्याचा थेट लाभ तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना मिळतो. यज्ञ हे असे माध्यम आहे, ज्याद्वारे तुमचे मंत्रोच्चार आणि तुम्ही अर्पण केलेली सेवा परमेश्वरापर्यंत सहज पोचते. विशेषतः अधिक मासाला भगवंताचे वरदान असल्याने या काळात केलेली उपासना इतर महिन्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक फळ देते; म्हणूनच अधिक मासात यज्ञ, याग, जप आणि ग्रंथवाचन करण्याचे विशेष महत्त्व आहे.

कर्जत येथील ह.भ.प. श्रीराम पुरोहित यांचे मार्गदर्शन

(पानावर) पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करतांना प.पू. प्रसाद महाराज

अधिक मासाचे औचित्य साधून सद्गुरु आणि पांडुरंग यांच्या झालेल्या प्रत्यक्ष दर्शनामुळे जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक झाले आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या ‘यज्ञ’ संस्कृतीमध्ये केवळ पैसा किंवा द्रव्य महत्त्वाचे नसून त्यामागील ‘समर्पणाची भावना’ (हे माझे नाही, तर देवाचे आहे) अत्यंत श्रेष्ठ आहे; हीच भावना जगात युद्ध थांबवून शांतता निर्माण करू शकते. परमार्थात स्थिरता आल्यावर लक्षात येते की, गाडी, बंगला यांसारख्या प्रापंचिक सुख-सुविधा आणि इच्छा केवळ लहान मुलाच्या हातातील खेळण्यासारख्या क्षणभंगुर असून त्या कधीही पूर्ण आनंद देऊ शकत नाहीत; म्हणूनच संतांनी या सर्व इच्छा बाजूला सारण्यास सांगितले आहे. जगातील इतर सर्व रसांचा (भोगांचा) माणसाला शेवटी वीट येतो; परंतु भगवंताच्या नामाचा रस असा आहे की, ज्याची गोडी कधीच अल्प होत नाही. प्रारंभी आपल्याला नाम घ्यावे लागते, नंतर नाम आपल्याला सोडत नाही आणि अंतिम टप्प्यात श्वासाश्वासात नाम इतके भिनते की, नाम घेण्याची जाणीवही उरत नाही. हाच खरा परमार्थाचा परम संस्कार आणि भक्तीचा परमोच्च स्तर आहे.