आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात हे लक्षात घ्या !

पू. संदीप आळशी

१. आध्यात्मिक उपाय म्हणून नामजप करणार्‍यांनी आरंभी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधून काढलेला जप करून नंतर रामनामाचा जप करावा ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी काळानुसार साधना म्हणून प्रतिदिन श्रीरामाचा नामजप कमीतकमी १० माळा तरी करण्यास सांगितले आहे. हा नामजप मुख्यत्वे ‘आपत्काळातील संकटांपासून रक्षण व्हावे आणि रामराज्याची स्थापना व्हावी’, या उद्देशांसाठी सांगितला आहे.

आध्यात्मिक त्रास असणार्‍यांनी उपाय म्हणून नामजप करतांना आरंभी ‘प्राणशक्तीवहन पद्धती’नुसार शोधून काढलेला जप करणे आणि त्यानंतर श्रीरामाचा नामजप करणे अधिक योग्य आहे. याचे कारण म्हणजे, पंचतत्त्वे (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) किंवा निर्गुण यांपैकी ज्या तत्त्वाशी संबंधित त्रास आपल्याला असतो, त्या तत्त्वाचा नामजप शोधून काढून तो केल्याने त्रास लवकर दूर होतो. यानंतर रामनामाचा जप केल्याने काळानुसार आवश्यक असलेले रामतत्त्व अधिक प्रमाणात ग्रहण होऊ शकते.

२. आध्यात्मिक उपाय करतांना आवरण काढणे आणि न्यास करणे, हे स्थुलातून शक्य नसल्यास सूक्ष्मातून करावे ! 

‘आध्यात्मिक उपाय करतांना आधी स्वत:च्या देहावरील आवरण काढणे, तसेच नामजप करतांना न्यास असल्यास तो करणे महत्त्वाचे असते; कारण यांमुळे उपाय अधिक परिणामकारक होतात. काही वेळा मात्र व्यक्तीला अती थकव्यामुळे किंवा हात दुखत असल्यामुळे आवरण काढणे किंवा न्यास करणे शक्य होत नाही. प्रवास करतांना, एखाद्या कार्यालयात गेल्यावर तेथे नामजप करतांनाही आवरण काढणे आणि न्यास करणे बहुधा शक्य होत नाही. अशा वेळी सूक्ष्मातून आवरण काढावे आणि न्यास करावा. या दोन्ही क्रिया सूक्ष्मातून करणे, म्हणजे या क्रिया आपण स्थुलातून जशा करू तशाच पण मनाने करणे. ‘आपण या क्रिया स्थुलातून केल्यावर जेवढा लाभ होतो, जवळजवळ तेवढाच लाभ या क्रिया सूक्ष्मातून केल्यानेही होतो’, असे मी अनेकदा अनुभवले आहे.’

– (पू.) संदीप आळशी (२४.५.२०२६)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.