राज्यातील सरकारी खात्यांतील सर्व रिक्त पदे निवड आयोगाकडून भरणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २२  मे (वार्ता.) – राज्यातील नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता, नियमबद्धता आणि गुणवत्ता यांना प्राधान्य देण्यासाठी सरकारी खात्यांतील रिक्त पदे निवड आयोगाकडून भरण्याचा सरकारचा ठाम निर्णय असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवड आयोग स्थापन झाल्यापासून विविध खात्यांतील अनेक पदे यशस्वीपणे भरली गेली असून यापुढेही सहस्रो पदांची भरती याच माध्यमातून केली जाईल. या भरती प्रक्रियेत कोणताही जवळचा मार्ग अवलंबला जाणार नाही. सरकारकडून विविध महामंडळांमध्येही भरती प्रक्रिया चालू असून मनुष्यबळ विकास महामंडळाकडून काही पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इतर खात्यांमध्येही आवश्यकतेनुसार भरती चालू आहे.’’

सरकारी नोकरभरतीविषयी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली सूत्रे

१. सरकारी नोकरभरती पारदर्शकता राखणे आणि पात्र उमदेवारांना समान संधी उपलब्ध करून देणे, हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

२. सर्व विभागांनी त्यांच्या अखत्यारितील रिक्त पदांची अचूक माहिती कर्मचारी निवड आयोगाकडे देणे बंधनकारक आहे.

३. आतापर्यंत आयोगाकडून २ सहस्र ५०० पदे भरण्यात आली असून उर्वरित पदे याच प्रक्रियेतून भरली जातील.

४. राज्यात २२ सहस्र पदे रिक्त असून शिक्षण, आरोग्य, प्रशासन यांसारख्या प्रमुख विभागांमध्ये मनुष्यबळाची तीव्रता जाणवत आहे. रिक्त पदांमुळे काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे.

५. नियमित भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून निवडणुकीपूर्वी बहुतांश पदे भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

येत्या ६ महिन्यांत २२ सहस्र पदे भरली जातील ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जणू जादूगार असून राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील सुमारे २२ सहस्र रिक्त पदे विधानसभा निवडणुकीपूर्वी भरली जातील, असा ठाम विश्वास आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. पणजी येथील ‘नर्सिंग डे’निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांना म्हणाले, ‘‘राज्यात सरकारी नोकर्‍यांविषयी मोठी उत्सुकता असून मुख्यमंत्री आणि भाजप सरकार सर्व रिक्त पदे भरण्यास कटीबद्ध आहे. मला लोकांची काळजी आहे, तितकीच ती मुख्यमंत्र्यांनाही आहे. नियोजित वेळेत भरती पूर्ण झाल्यास राज्यातील तरुणांमध्ये समाधान निर्माण होईल. पेडिएट्रिक न्युरो रिहॅब आणि इतर विभागांतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन मी स्वतःच्या खिशातून देत आहे. संबंधित नियुक्त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असला, तरी काम चालू ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांना रूजू करून घेतले आहे. हा विभाग माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने मी हे आर्थिक उत्तरदायित्व घेतले आहे.’’