‘सेक्युलर’ विचार सोडून सर्व हिंदूंनी धर्मरक्षणासाठी संघटित व्हावे ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त शिरवळ (सातारा) येथे विराट हिंदु संमेलन पार पडले

आमदार महेश लांडगे

शिरवळ (जिल्हा सातारा) – सेक्युलर (निधर्मी), तथाकथित पुरोगामी यांमुळे हिंदूंचे विभाजन होत चालले आहे. त्यामुळेच हिंदु धर्मावर आघात वाढतात; म्हणून सेक्युलर विचार सोडून सर्व हिंदूंनी धर्मरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे १७ मे या दिवशी सकल हिंदु समाज आणि संमेलन समिती यांच्या वतीने विराट हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. महेश लांडगे यांनी उपस्थित हिंदूंना संबोधित करून सर्वांना धर्मशिक्षण घेण्याचे आवाहन केले. या वेळी संमेलनाला २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

विराट हिंदु संमेलनाला उपस्थित धर्मप्रेमी

हिंदु स्त्रियांनी स्वतः धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध होणे आवश्यक ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती 

कु. क्रांती पेटकर

आजच्या काळात लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून वाचायचे असेल, तर हिंदु स्त्रियांनी स्वतः धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे. हिंदु माता-भगिनी धर्मशिक्षण घेत नसल्याने ‘कॉर्पोरेट जिहाद’सारख्या षड्यंत्राला भूलतात. प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन जागृत रहाणे आवश्यक आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी सांगितले.

हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक श्री. पंडित दादा मोडक यांनी गोरक्षकांवर होत असलेला अन्याय मांडून गोरक्षक जिवावर उदार होऊन गायींचे रक्षण करतात, त्याला प्रशासनानेही कायदेशीर सहकार्य करून गोतस्करांवर कारवाई केली पाहिजे, असे मनोगत मांडले.

सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. राजेंद्र अलोने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या शताब्दीनिमित्त चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच संघाचा कार्यप्रवास स्वत:च्या मार्गदर्शनातून उपस्थितांसमोर मांडला, पंच परिवर्तन उपक्रमांची माहिती दिली.

सोळशी येथील ‘शनेश्वर देवस्थाना’चे प.पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी आज सर्वांनी हिंदु म्हणून जगणे आवश्यक असून जिथे जाल तिथे धर्माला धरून राहिले पाहिजे, धर्म टिकवला पाहिजे आणि हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या आरंभीला श्री. नागेश तनपुरे यांनी प्रस्तावना सांगून संमेलनाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. जितेंद्र मगर यांनी केले.