पुणे शहरातील प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या शिकवणीवर्गावर महापालिकेची कारवाई !

  • मालमत्ताकर थकीत असल्याचे प्रकरण    

  • शिकवणीवर्गाची जागा लाखबंद

पुणे – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने मोटेगावकर यांच्या मालमत्तांवर धडक कारवाई चालू केली. शहरातील ‘आर्.सी.सी.’शी (‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’शी) संबंधित मालमत्ता लाखबंद (सील) करण्यात आली असून महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे संकेत दिले.

शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील बोरावके इमारतीमध्ये असलेल्या ‘आर्.सी.सी.’ शिकवणीवर्गामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी ‘नीट’ आणि ‘जेईई’चे शिकवणीवर्ग घेतले जात होते. थकित मालमत्ता कर आणि नियमबाह्य व्यावसायिक वापराच्या आरोपांमुळे महापालिकेने संबंधित जागा लाखबंद केली. महापालिकेच्या प्राथमिक पडताळणीमध्ये या मालमत्तेवर ३ कोटी २० लाख रुपयांचा मालमत्ताकर थकित आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पाऊल टाकत जागा लाखबंद केली. इमारतीच्या मूळ आराखड्यात विनाअनुमती पालट केले होते. पार्किंगच्या जागांमध्ये फेरफार, अतिरिक्त बांधकाम आणि नियमबाह्यपालट आढळल्याने बांधकाम विभागाने कारवाई केली. मोटेगावकर यांच्याशी संबंधित शहरातील इतर मालमत्तांवरही थकित कर, अनुमती आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? याची पडताळणी करण्यात येणार आहे.