दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक आणि समन्वयक म्हणून सेवा करतांना प्रियोळ (म्हार्दाेळ, गोवा) येथील श्री. अशोक चिटणीस (वय ६३ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

‘मी मागील १० ते १२ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वितरक आणि समन्वयक म्हणून सेवा करत आहे. ही सेवा करत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांनी साधना म्हणून चालवलेले एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ !

१. ही सेवा करतांना मला कधी आळस आला नाही, तसेच ‘सेवा करू नये’, असेही मला कधी वाटले नाही.

२. मला दैनिक ‘सनातन प्रभात’चा एकेक वाचक आणि वर्गणीदार वाढवण्याची तळमळ लागलेली असते. त्यासाठी ‘गुरुदेवच माझ्याकडून प्रयत्न करून घेत आहेत’, याची मला आतून जाणीव होते.

श्री. अशोक चिटणीस

३. दैनिकाचा एखादा वाचक वाढल्यावर मला वेगळाच आनंद मिळतो आणि माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.

४. कधी कुठे बाहेर जायचे झाल्यास इतर साधक मला वितरणाच्या सेवेत साहाय्य करतात, तसेच इतर साधकांना कधी अडचण असल्यास त्यांची वितरणाची सेवा करण्यास माझीही नेहमीच सिद्धता असते.

५. एकदा मडकई (गोवा) येथे वितरण करण्याविषयी मला एक मोठी अडचण आली. ‘दैनिकाचे वितरण कोण करणार ?’, असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करत होतो. माझे मनही स्थिर होते. तेवढ्यात मडकईतील एका साधकाकडे पाहुणा म्हणून आलेल्या एका तरुण साधकाने वितरण करण्याची सिद्धता दर्शवली आणि गुरुकृपेने तो प्रश्न सुटला.

यातून मला ‘स्थिर राहून आणि सर्व गुरुदेवांवर सोडून प्रयत्न करत राहिल्यास गुरुदेवच मार्ग दाखवतात’, याचा प्रत्यय आला. तेव्हापासून आजपर्यंत ‘इतर साधकांना वितरण करण्यास अडचण आल्यास दुसरा एखादा साधक त्यांना साहाय्य करतो’, याची अनुभूती येते.

६. एकदा माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म करावे लागले; परंतु गुरुकृपेने शस्त्रकर्मासाठी लागणारे पैसे लगेच उपलब्ध झाल्याने मला काहीच ताण आला नाही आणि शस्त्रकर्मही निर्विघ्नपणे पार पडले.

७. माझी गुरुसेवा अखंडपणे चालू होती. या कालावधीत माझ्या मुलांचे शिक्षणही सुरळीतपणे पूर्ण झाले. मला त्याचे कधी ओझे वाटले नाही.

८. ‘माझ्या घरातील सर्व मंडळी परिस्थिती स्वीकारून समाधानी असतात’, ही केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे.

हे गुरुदेवा, आपणच सुचवलेले हे शब्द आपल्या चरणी अर्पण करून मी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अशोक चिटणीस (वय ६३ वर्षे), प्रियोळ, म्हार्दाेळ, गोवा. (९.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक