प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

सातारा, १८ मे (वार्ता.) – प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम संथ गतीने चालू आहे. या कामाला गती देण्यासह हे काम उत्तम प्रतीचे करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री देसाई यांनी प्रतापगड येथे चालू असलेल्या संवर्धन कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे आदी मान्यवर आणि किल्ले प्रतापगड येथील नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘प्रतापगड संवर्धनाच्या बांधकामावर प्रतिदिन पाणी मारले जात नाही. प्रतापगडावर अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी आणून पाणी मारावे. संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. तरी संवर्धनाच्या कामाविषयी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्याप्रमाणे प्रतापगड होता, त्याच पद्धतीने संवर्धनाचे काम झाले पाहिजे. गडावरील झाडेझुडपे काढून संवर्धनाचे काम करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ अधिकाधिक झाडे लावावीत.’’