आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्वसिद्धता १५ दिवसांत पूर्ण करा ! – प्रकाश आबीटकर, पालकमंत्री

आढावा बैठकीत सूचना देतांना पालकमंत्री प्रकाश आबीटकर

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत अतीवृष्टीचा धोका अधिक असतो. हा गेल्या २५ वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. अलमट्टी आणि हिप्परगी धरणांविषयी बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमावी. वारणा धरण वगळता इतर धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अल्प असल्याने, तसेच ‘अल निनो’चा प्रभाव पहाता उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी केल्या. या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती ही प्रामुख्याने अलमट्टी अन् हिप्परगी धरणांतील पाणी विसर्गावर अवलंबून असते. या वर्षीच्या पावसाळ्यात पाण्याचे चोख नियोजन करण्यासाठी आणि विसर्गाचा समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र अन् कर्नाटक यांच्यात आंतरराज्य समन्वय बैठक तातडीने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संकेतस्थळ

१. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलेल्या सादरीकरणानुसार जिल्ह्यात ३९१ गावे पूरबाधित असून ८८ गावांना भूस्खलनाचा धोका आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी ४८८ निवारा केंद्रे’ सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावर २४ घंटे नियंत्रण कक्ष कार्यरत असतील.

२. नदीपात्रातील जलपर्णी, गाळ आणि वाढते प्रदूषण यांमुळे पुराची तीव्रता वाढत असल्याचे सूत्र शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी मांडले. भाजप आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्यावरील ताण आणि जलपर्णी काढण्यासाठी कायमस्वरूपी निधीची मागणी केली, तर अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी गाळ काढण्याच्या प्रस्तावाविषयी नाराजी व्यक्त केली.

३. पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की, नदी खोलीकरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल.