Bengal Cow Slaughter Ban : बंगालमध्ये गोहत्येवर बंदी !

  • मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचा निर्णय

  • सार्वजनिक पशूवधगृहेही बंद

  • जनावरांच्या हत्येसाठी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक

बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी

कोलकाता (बंगाल) – बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी राज्यात गोहत्या करण्यावर बंदी घातली. त्यांनी वर्ष १९५० च्या ‘बंगाल पशुहत्या नियंत्रण अधिनियमा’चा आणि वर्ष २०१८ च्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत एक नोटीस प्रसारित केली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यावर ६ महिन्यांपर्यंत कारावास आणि १ सहस्र रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘वैद्यकीय प्रमाणापत्रा’विना कोणत्याही जनावराची हत्या पूर्णपणे प्रतिबंधित आहे. प्रमाणपत्र केवळ नगरपालिकेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे प्रमुख आणि एका सरकारी पशुवैद्यकासमवेत मिळून प्रसारित केले जाईल. हे प्रमाणपत्र तेव्हाच दिले जाईल, जेव्हा प्राधिकरण सहमत असेल की, जनावर १४ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहे, ते प्रजननासाठी योग्य नाही आणि वृद्ध आहे. घायाळ आणि अपंग आहे, किंवा असाध्य रोगामुळे अक्षम आहे.

जर प्रमाणपत्र देण्यास नकार दिला गेला, तर कोणतीही व्यक्ती प्रमाणपत्र रहित झाल्याची सूचना मिळाल्याच्या १५ दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील करू शकते.

सार्वजनिक पशूवधगृहांवरही बंदी !

याव्यतिरिक्त सार्वजनिक पशूवधगृहांवरही बंदी घालण्यात आली आहे. सरकारने म्हटले आहे की, जनावरांची हत्या केवळ नगरपालिकेच्या पशूवधगृहात किंवा स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या पशूवधगृहातच केली जाईल.

संपादकीय भूमिका

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर तत्परतेने हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे ! येथे एवढेच पाहिले पाहिजे की, घेतलेल्या निर्णयांची पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून तितक्याच तत्परतेने आणि सतर्कपणे कार्यवाही केली जात आहे ना ?