‘झाडू’पासून ‘जुळवाजुळवी’पर्यंत : आम आदमी पक्षाची (‘आप’ची) कहाणी कि दीर्घ राजकीय नाटक ?

एक काळ असा होता, जेव्हा आम आदमी पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नव्हता, तर तो एक भावना, बंडखोरी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध नैतिक निषेध होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातून प्रेरित होऊन ते बाहेर आले. हजारे यांचा अरविंद केजरीवाल हा सर्वांत प्रमुख चेहरा होता; परंतु तेथेच या कथेतील वळण मनोरंजक आणि काहीसे उपरोधिक पद्धतीने येते; कारण ‘व्यवस्था पालटण्या’च्या उद्देशाने चालू झालेली चळवळ त्यांनी एकेकाळी ज्या व्यवस्थेला विरोध केला होता, त्या व्यवस्थेसारखी दिसू लागली.

१. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सक्रीयतेचे राजकारणात झालेले रूपांतर

जेव्हा सक्रीयतेचे राजकारणात रूपांतर झाले, तेव्हा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग वेगळे झाले, तेव्हा प्रारंभीच मतभेद दिसू लागले. आंदोलनाच्या साधेपणाचे सत्तेच्या धोरणात रूपांतर झाले. बाबा रामदेव यांच्यासारखे मित्रपक्षही वेगळे झाले. नैतिक निरपेक्षतेची भाषा राजकीय सोयीच्या व्याकरणात पालटली आणि नंतर पहिला मोठा विरोधाभास आला की, राजकारणात ‘कधीही नाही’ असे अनेकदा म्हणणारा पक्ष शांतपणे ‘कधी कधी’ असे होते, असे म्हणू लागला.

२. वेगळे असल्याचा दावा करणार्‍या पक्षाच्या भूमिकेत झालेला पालट

विरोधाभास येथेच थांबले नाहीत. एकेकाळी द्रमुकचे एम्.के. स्टॅलिन यांच्यावर तीव्र टीका झाली आणि नंतर त्यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्याशी मैत्री दर्शवली. हा काही छोटासा पालट नव्हता, तर हा एक मोठा पालट होता. एकेकाळी ‘वेगळा’ असल्याचा दावा करणारा पक्ष आता परिचित दिसू लागला होता.

३. प्रारंभी भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप, नंतर क्षमा मागत तडजोड करून प्रकरण संपवणारे आम आदमी पक्षाचे नेते !

शंतनू गुप्ता

‘आप’च्या राजकारणाने एक विचित्र लय विकसित केली, आरोपांचे वादळ आणि त्यानंतर उपायांचे मौन. शक्तीशाली व्यक्तींवर मोठे आरोप केले गेले; परंतु क्वचितच त्यांच्या तार्किक कायदेशीर निष्कर्षांपर्यंत आणले गेले. नितीन गडकरी आणि अरुण जेटली यांच्या विरोधातील २ प्रकरणांमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सार्वजनिक क्षमा मागितल्याने अनपेक्षित खटला समाप्तीचे संकेत मिळाले. हा एक पक्ष होता ज्याने पुराव्यावर आधारित भ्रष्टाचाराच्या विरोधात आश्वासन दिले होते; परंतु अनेकदा

अशी प्रकरणे क्षमा मागून तडजोड करून प्रकरण संपवण्यापर्यंतच थांबत होती. त्यानंतर सत्ता आली आणि त्यांचेच पोलीस अन्वेषण चालू झाले.

४. पोकळ आश्वासने आणि भ्रष्टाचार यांमुळे ‘आप’ची धोरणांच्या उलट निर्माण झालेली प्रतिमा

देहलीतील प्रशासनाला मोहल्ला दवाखाने आणि शैक्षणिक सुधारणा यांसारख्या आश्वासनांद्वारे सादर केले गेले होते; परंतु त्यालाही टीका आणि प्रतिटीका सहन करावी लागली. यमुनेचे ‘थेम्स’सारख्या नदीत (इंग्लंडमधील एक नदी) रूपांतर करण्याचे वचन हळूहळू वास्तविक पालटाऐवजी केवळ वक्तृत्व बनले. याच कालावधीत भ्रष्टाचाराचे आरोप, मद्य धोरणातील वाद, प्रशासकीय प्रश्न आणि आता मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेला ‘शिश महल’ वाद समोर येऊ लागला, जो पक्षाच्या साधेपणाच्या अन् मितव्ययीपणाच्या मूळ प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होता.

५. पक्षातील नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडणे

मग चालू झाली आतील कथा. कदाचित् सर्वांचा खुलासा करणारा अध्याय. एकेकाळी अंतर्गत लोकशाहीला पाठिंबा देणार्‍या पक्षातील प्रमुख आवाज हळूहळू बाहेर पडतांना किंवा दुर्लक्षित होतांना दिसले. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आशुतोष, कुमार विश्वास हे प्रारंभीच बाहेर पडले होते. नंतर स्वाती मालीवालसारख्या ख्यातनाम व्यक्तींशी संबंधित तणावामुळे ही कथा आणखी गुंतागुंतीची झाली. राजकारणात हे सामान्यपणे घडते; परंतु येथे त्यात एक तीव्र विडंबन होते; कारण त्याच पक्षाने इतरांवर त्यांच्या ‘हायकमांड संस्कृती’साठी (पक्षश्रेष्ठी संस्कृतीसाठी) टीका केली होती. एक नमुना समोर येऊ लागला, पुष्कळ प्रख्यात झालेला कोणताही नेता अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अस्वस्थ होऊ लागला आणि या प्रक्रियेत आम आदमी पक्ष एकेकाळी विरोध केलेल्या राजकीय संरचनेसारखा दिसू लागला.

६. भ्रष्टाचाराच्या विरोधात जन्मलेल्या चळवळीची आता विश्वासार्हतेसाठी धडपड

कदाचित् हा सर्वांत मोठा विरोधाभास आहे. ‘राजकीय रंगभूमी’च्या विरोधात बंड म्हणून चालू झालेली चळवळ हळूहळू या रंगभूमीचे सातत्यपूर्ण प्रदर्शन बनली. प्रशासन आणि नाटक यांच्यातील रेषा धूसर झाली होती. राघव चढ्ढा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग यांचा समावेश असलेल्या अलीकडील घडामोडी, तसेच अनेक खासदारांनी पक्ष तोडल्याचे किंवा पक्ष सोडल्याचे वृत्त नेहमीच्या राजकीय अस्थिरतेपेक्षा बरेच गंभीर संकेत देतात अन् कदाचित् या भेटीतून मिळालेला हा सर्वांत धारदार निष्कर्ष आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जन्मलेली चळवळ आता विश्वासार्हतेच्या प्रश्नांशी झुंज देत आहे आणि जर ती अशीच चालूच राहिली, तर इतिहास त्याला ‘एक धाडसी राजकीय प्रयोग’ म्हणून नव्हे, तर ‘एक अपूर्ण वचन’ म्हणून लक्षात ठेवेल. एक वचन ज्याचा अंतिम अध्याय विजयात नव्हे, तर निरोपात लिहिला जात आहे. राघव चढ्ढा यांचे जाणे हे एकेकाळी अरविंद केजरीवाल यांनी मांडलेल्या राजकीय प्रचार मोहिमेतील शेवटचे पाऊल असू शकते.

लेखक : शंतनू गुप्ता, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चरित्रलेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि राजनैतिक विश्लेषक, उत्तरप्रदेश.