Tamil Nadu New CM : जोसेफ विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान !

९ मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश

जोसेफ विजय

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून टीव्हीके (तमिलगा वेत्री कळघम् – तमिळनाडू विजय महासंघ) पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी १० मे या दिवशी शपथ घेतली. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. विजय यांच्यासमवेत ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आर्लेकर यांनी जोसेफ विजय यांना १३ मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी केल्या ३ घोषणा

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जोसेफ विजय यांनी नागरिकांना २०० युनिट विनामूल्य वीज देणे, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘विशेष कृती दल’ स्थापन करणे, या घोषणा केल्या. (सर्वच राजकीय पक्ष जनतेला राजकीय लाभासाठी विनामूल्य गोष्टी देऊन लाच देत आहेत; मात्र यासाठी खर्च होणारे पैसे जनतेच्याच खिशातून काढले जाणार आहेत, हे त्यांना कसे कळत नाही ? – संपादक)