Shiv Temple Demolished : वारंगल (तेलंगाणा) येथे शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडले

पाडण्यात आलेले शिवमंदिर

वारंगल (तेलंगाणा) – वारंगल जिल्ह्यात सरकारी शाळेसाठी ८०० वर्षे जुने काकतीय काळातील शिवमंदिर पाडण्यात आले. खानापूर येथील अशोकनगरमध्ये असलेले हे मंदिर १३ व्या शतकातील काकतीय राजा गणपतिदेव यांच्या काळातील होते. या मंदिरात असलेल्या शिलालेखात राजाला ‘महाराज’ आणि ‘राजाधिराजुलु’ असे संबोधणार्‍या दुर्मिळ ७ तेलुगु भाषेतील ओळी होत्या. वर्ष १९६५ मध्ये वारसा विभागाने या मंदिराची नोंदणी केली होती. हे मंदिर प्राचीन किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक ‘कोटा कट्टा’ नावाच्या मातीच्या किल्ल्याच्या परिसरात होते. ‘या वारसा स्थळाचे सहज संरक्षण करता आले असते किंवा त्याचे स्थलांतर करता आले असते’, असे पुरातत्वतज्ञांचे म्हणणे आहे.

मंदिर पाडल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट

मंदिर पाडल्याप्रकरणी तेलंगाणाचे अधिवक्ता रामराव इम्मनेनी यांनी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या संदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि पुरातत्व विभागाने गुन्हा नोंदवला आहे. राज्य सरकार अनिवार्य वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुरातत्व आणि धर्मादाय विभागाकडून अनुमती घेणे आवश्यक असतांना ती न घेता मंदिर पाडण्याला देणार्‍यांवर तेलंगणा वारसा कायद्याच्या कलम ३० अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

काँग्रेसच्या आमदाराची घटनास्थळी भेट

मंदिर हेतूपुरस्सर उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप वारंगल जिल्हा प्रशासनाने फेटाळून लावला आहे. ‘३० एकर जागेवरील दाट झाडी साफ करताना केवळ जुने मोडकळीस आलेले अवशेषच आढळून आले. हे अधिकृतपणे संरक्षित स्मारक म्हणून नोंदणीकृत नाही’, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. मंदिर पाडल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रात तीव्र विरोध व्यक्त होत आहे. जनतेच्या वाढत्या संतापाला पाहून वारंगलच्या जिल्हाधिकारी डॉ. सत्य शारदा आणि नरसंपेटचे आमदार दोंती माधव रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्याच ठिकाणी मंदिराची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात इतिहासकार, पारंपरिक वास्तूविशारद आणि पुरातत्व विभागाशी सल्लामसलत करून पुढील कारवाई करण्यात येणार’, असे आश्वासन देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात याहून वेगळे काय होणार ?
  • शाळेसाठी मशीद किंवा चर्च पाडण्याचे धारिष्ट्य तेलंगाणा प्रशासनाने दाखवले असते का ?