पुणे जिल्ह्यातील ८४ ‘रेडी मिक्स काँक्रीट’ प्रकल्प बंद !

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची कारवाई

‘रेडी मिक्स काँक्रीट’ प्रकल्प

पुणे – शहराच्या परिसरात ‘रेडी मिक्स काँक्रीट’ (आर्.एम्.सी.) प्रकल्पांची संख्या वाढत आहे. या प्रकल्पांकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असून त्यातून हवा प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने गेल्या वर्षीपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील २५ टक्क्यांपेक्षा अधिक ‘आर्.एम्.सी. प्रकल्प’ बंद केले आहेत. या आर्.एम्.सी. प्रकल्पांविषयी अनेक ठिकाणांहून तक्रारी येत होत्या. हवा प्रदूषणात वाढ होत होती. त्यामुळे ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने जानेवारी २०२५ पासून या प्रकल्पांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला.

या प्रकल्पांची पडताळणी मोहीम चालू केली. त्यात नियमांचे उल्लंघन करणारे ८४ प्रकल्प बंद करण्याची कारवाई केली होती. पुणे जिल्ह्यात एकूण ३५० आर्.एम्.सी. प्रकल्प आहेत. पुणे शहरातील १०५, पिंपरी-चिंचवड शहरातील १२२ आणि ग्रामीण भागातील १२३ प्रकल्पांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे म्हणाले, ‘‘अशा आर्.एम्.सी. प्रकल्पांविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. आतापर्यंत ८४ प्रकल्प बंद केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई होत आहे. या प्रकल्पांची मंडळाकडून सातत्याने पडताळणी करण्यात येत आहे.’’