Saugata Roy : दादागिरी आणि खंडणीखोरी यांमुळे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव !

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलले खासदार सौगत रॉय यांची स्वीकृती !

सौगत रॉय

कोलकाता (बंगाल) – निवडणुकीच्या काळात आणि त्यापूर्वी बंगालमध्ये अत्यंत खालच्या स्तरावर दादागिरीचे वातावरण होते. स्थानिक पातळीवरील नेते आणि ‘दादा’ (गुंड प्रवृत्तीचे लोक) लोक यांनी चुकीचे वातावरण निर्माण केले. त्यांनी लोकांकडून पैशांची वसुली केली, यामुळे पक्षाविषयी जनतेत नकारात्मक संदेश गेला, अशी स्वीकृती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनी ‘न्यू १८’ या वृत्तवाहिनीसमोर दिली.

जिथे ममता बॅनर्जी म्हणत होत्या की, निवडणुका निष्पक्ष झाल्या नाहीत, तिथे सौगत रॉय यांनी स्पष्टपणे मान्य केले की, मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले. एकीकडे ममता बॅनर्जी यांनी ‘पराभवामागे कटाचा भाग आहे’, असे म्हटले, दुसरीकडे रॉय यांनी उघडपणे स्वीकारले की, तळागाळातील आमच्याच नेत्यांच्या दादागिरीमुळे आणि खंडणीखोरीमुळे पक्षाची मुळे पोखरली होती.

सौगत रॉय यांनी मांडलेली सूत्रे

१. स्थानिक पातळीवर सत्तेचा दुरुपयोग आणि दादागिरी झाली होती.

२. पक्षाच्या विरोधात मोठी सत्ताविरोधी लाट होती, जी समजून घेण्यात नेतृत्व अपयशी ठरले.

३. हिंदु मतांचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण झाले, जे पक्षाच्या पराभवाचे एक मोठे कारण बनले.

४. केंद्रीय अर्धसैनिक दलांची काही प्रमाणात कडक शिस्तीमुळे मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले.

५. या सूत्रांवर अद्याप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

संपादकीय भूमिका

पराभवावरून निवडणूक आयोग आणि भाजप यांना दोष देणार्‍या ममता बॅनर्जी यांना हा घराच अहेर असून त्यांनी याचे अंर्तमुख होऊन परीक्षण केले नाही आणि सुधारणा केली नाही, तर त्यांचा पक्षा इतिहासजमा होणार, यात शंका नाही !