Punjab Blast : जालंधर आणि अमृतसर येथे सैन्यांच्या तळांजवळ बाँबस्फोट : १ सैनिक घायाळ

  • ‘खलिस्तान लिबरेशन आर्मी’ने बाँबस्फोटांचे दायित्व स्वीकारले

  • पंजाबमध्ये सतर्कतेची चेतावणी

जालंधर / अमृतसर (पंजाब) – पंजाबमध्ये ५ मेच्या रात्री २ बाँबस्फोट झाले. एक स्फोट अमृतसरमध्ये भारतीय सैन्याच्या तळाबाहेर, तर दुसरा जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर करण्यात आला. या स्फोटांत सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक घायाळ झाला. या बाँबस्फोटानंतर राज्यात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. ‘खलिस्तान लिबरेशन आर्मी’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने या बाँबस्फोटांचे दायित्व स्वीकारले आहे.

१. अमृतसर कँटजवळ रात्री १० वाजून ५० मिनिटांनी काही बुरखाधारी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन कँटच्या भिंतीच्या दिशेने स्फोटक फेकले, त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलीस आणि बाँब शोधक अन् नाशक पथक घटनास्थळी पोचले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करून ते पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे ग्रेनेड आक्रमण असावे, असा पोलिसांना संशय आहे. अमृतसरचे पोलीस अधीक्षक आदित्य वॉरियर यांनी सांगितले की, या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले असून हा नेमका कोणत्या प्रकारचा स्फोट होता ?, याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

२. जालंधरमधील झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, एका स्कूटरला आग लागल्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला. याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोचून आग विझवली. या स्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी गुरप्रीत सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्या स्कूटीमध्ये आग लागून स्फोट झाला, त्या स्कूटीचा तो मालक असल्याचे सांगितले जात आहे. तो ‘फ्लिपकार्ट’चा (ऑनलाईन वस्तू विक्री करणारे आस्थापन) वितरक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक घायाळ झाला.

३. या दोन्ही घटनांवरून शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया, भाजपचे पंजाबचे सरचिटणीस परमिंदर सिंह ब्राम आणि काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंजाबच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणाकडे लक्ष वेधत भाजपच्या नेत्याने या घटनेसाठी ‘आप’ सरकारला उत्तरदायी धरले आहे.