भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड रहित !

जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र अवैध घोषित !

गायत्री भंगाळे

भुसावळ (जळगाव) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. यामुळे शासनाने त्यांचे नगरसेवक आणि नगराध्यक्षपद रहित केले. गायत्री भंगाळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षा होत्या. समितीच्या निर्णयाला भंगाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून पुढील सुनावणी १२ मे या दिवशी होईल. जर न्यायालयाने समितीचा निर्णय कायम ठेवला, तर भुसावळ नगरपालिकेत पोटनिवडणूक अटळ आहे.

१. नगरपरिषदेच्या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी राज्याचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला.

२. भंगाळे यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप रजनी सावकारे आणि भाजपचे अन्य पदाधिकारी यांनी घेतला. भंगाळे महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी नसल्याचेही तक्रारीत म्हटले. तक्रारीची नोंद घेत जिल्हा जात पडताळणी समितीने सखोल चौकशीनंतर जात प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याचे सांगितले.

३. समितीच्या अहवालानुसार जिल्हाधिकार्‍यांनी राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला. त्यावरून सरकारने त्यांना अपात्र घोषित केले.

गायत्री भंगाळे यांनी म्हटले आहे की, ही कारवाई राजकीय द्वेषापोटी आणि मंत्री संजय सावकारे यांच्या दबावाखाली करण्यात आली आहे.