१४ गावांची ग्रामपंचायतीची कार्यालये नवी मुंबई महापालिकेत ४ मासांनंतरही समाविष्ट नाहीत !

नवी मुंबई – कल्याण-डोंबिवली ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे ही नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येऊन ४ मास उलटले, तरी ग्रामपंचायतीची कार्यालये मात्र नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत गेलेली नाहीत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला १५ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

ही १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट होण्यासाठी येथील नागरिकांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता. या १४ गावांमध्ये दूषित पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. भूमीत रसायनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कूपनलिकेतून खराब पाणी येते. येथे नळपाणी योजना पूर्ण झालेली नाही. वाहिन्या असूनही त्यातून पाणी येत नाही. पाण्याच्या टाकीचे कामही रखडले आहे. भंगारमाफियांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केले आहे.

येथील भरत भोईर या नगरसेवकाने १५ मेपर्यंत महापालिकेच्या कार्यालयांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.

संपादकीय भूमिका

गावांचा महापालिकेत समावेश करण्यापूर्वीच ग्रामपंचायत आदी प्रशासकीय कार्यालयांच्या कारभाराचे स्थानांतर नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत करणे अपेक्षित होते. ४ मास उलटल्यावरही ही प्रक्रिया होत नसेल, तर गावातील नागरिकांनी त्यांच्या विविध कामांसाठी कुणाकडे दाद मागायची ?