गोंदिया येथे मुलीचा विनयभंग करणारे सेवानिवृत्त प्राचार्य पसार

मुलीचा विनयभंग करणारे सेवानिवृत्त प्राचार्य

गोंदिया – एका निवृत्त प्राचार्यांनीच देवरी येथे १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. काशिनाथ शहारे यांनी वसतीगृहातील मुलीला ‘माझ्या पत्नीच्या साडीला इस्त्री करून दे’, असे म्हणून घरी बोलावले. मुलीचा हात बळजोरीने पकडून तिला खोलीत नेले. पैशांचे आमीष दाखवून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मुलीने सुटका करून घेत देवरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला; मात्र घटनेला ६ दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. ‘आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला अटक केली जाईल’, असे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

शिक्षक पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीने असे कृत्य करणे, हे समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे. केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर समाजात धर्माचरण आणि नैतिक मूल्ये रुजवणे ही काळाची आवश्यकता आहे !