‘गोकुळ दूध उत्पादक संघा’च्या संचालक मंडळास मुदतवाढ नाही : ५ मे नंतर प्रशासकाची नियुक्ती ! 

कोल्हापूर, २ मे (वार्ता.) – ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ म्हणजेच ‘गोकुळ’च्या १ सहस्र ३२० संस्थांच्या पात्रतेविषयीची सुनावणी चालू आहे. या सुनावण्या पूर्ण होण्यास ३ ते ४ महिने लागू शकतात. संस्थांच्या अपात्रतेविषयी सुनावणी पूर्ण होईपर्यंत दूध संघाची निवडणूक घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सर्किटबेंच’ने (न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण, जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठराविक कालावधीत येऊन खटले (प्रकरणे) चालवतात) नकार दिला आहे. गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत ही ५ मे या दिवशी संपत आहे. त्यामुळे ‘गोकुळ’वर ५ मे नंतर प्रशासक येणार, हे निश्चित आहे, अशी माहिती ‘महादेव दूध संस्थे’चे संचालक प्रकाश बेलवाडे आणि भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत डावीकडून दुसरे आमदार शिवाजीराव पाटील, माहिती देतांना प्रकाश बेलवाडे, तसेच अन्य

प्रकाश बेलवाडे म्हणाले 

१. गोकुळच्या १ सहस्र ३२० संस्थांच्या पात्रतेविषयी आम्ही न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून त्या संदर्भातील पडताळणी चालू आहे. यातील किती संस्था खर्‍या ? आणि किती संस्था खोट्या ? हे समोर आलेच पाहिजे.

२. यातील ज्या संस्था खर्‍या आहेत, त्यांना मतदान करता आले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. या संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यावर निवडणुकीसाठी साधारणत: ४ महिने लागू शकतात. त्यामुळे साधारणत: १ वर्षे गोकुळ दूध संघावर प्रशासक राहू शकतो. या संदर्भातील मोठी लढाई आम्ही लढत असून त्यात आम्हाला न्याय मिळेल, असे आम्हाला वाटते.

गोकुळ दूध संघाच्या संदर्भात मी आक्षेप घेतलेल्या सूत्रांच्या अनुषंगाने एक स्वतंत्र चौकशी आयोग नेमण्यात आला असून ती चौकशी चालू आहे. गोकुळच्या गैरकारभाराचे जे पुरावे आहेत, ते सर्व मी सादर करणार आहे. यथावकाश प्रशासक आल्यावर यातील अनेक गोष्टी समोर येतील.

– शिवाजीराव पाटील, आमदार, भाजप