मलशुद्धीकरण प्रकल्प बंद; सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत !

देहूरोड येथील प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा परिणाम !

सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत !

देहू (जिल्हा पुणे) – येथील नगरपंचायतीच्या परिसरातील मलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रक्रियेविना सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते. परिणामी नदी प्रदूषित झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा मलशुद्धीकरण प्रकल्प तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मोठ्या खर्चातून उभारण्यात आलेला असून तो ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा आहे. प्रकल्पासाठी कर्मचारी आणि सुरक्षारक्षक नेमले असतांनाही तो कार्यरत नाही. अनेक ठिकाणी मैलावाहक वाहिनी आणि टाक्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. काही नागरिकांनी या टाक्या मुद्दाम फोडण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रदूषणामुळे जलचरांचा मृत्यू होत आहे. मलशुद्धीकरण प्रकल्प तात्काळ चालू करणे, फुटलेल्या टाक्या आणि वाहिनी दुरुस्त करणे, सांडपाणी थेट नदीत सोडणारी गृहसंकुले आणि गृहप्रकल्प यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे अन् संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे, या मागण्या नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? फुटलेले वाहिनी दुरुस्त करणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, हे प्रशासनाचे दायित्व ते कधी पार पाडणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषणाची ओरड करणारे प्रशासन इंद्रायणीतील सांडपाण्याविषयी गप्प का ? गणेशोत्सवाच्या वेळी कृत्रिम हौद, मूर्तीदान आणि अमोनियम बायकार्बोनेट यांचा आग्रह धरणारे प्रशासन आणि अंनिसवाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याविषयी स्पष्टीकरणही देऊ शकत नाही !
  • जनतेच्या करातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला प्रकल्प धूळ खात पडून असेल, तर त्या निधीचा उपयोग काय ?