पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील दर्शन मंडपात आढळल्या मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे !

(डावीकडे)श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, (उजवीकडे) सापडलेल्या मद्याच्या बाटल्या, मावा-गुटखा यांच्या पुड्या आणि सिगारेटची पाकिटे

पंढरपूर – लाखो वारकरी-भाविक यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात मद्याच्या बाटल्या, मावा-गुटखा यांच्या पुड्या आणि सिगारेटची पाकिटे आढळून आली आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी सखोल अन्वेषण करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ७ मजली दर्शन मंडपाच्या स्वच्छतेचे दायित्व ‘बी.व्ही.जी.’ आस्थापन आणि मंदिर समिती दोघांकडे असून या दोघांच्या निष्काळजीपणामुळे भाविकांमध्ये संताप उसळला आहे. (अशा पवित्र ठिकाणी मद्याच्या बाटल्या, मावा-गुटखा यांच्या पुड्या आणि सिगारेटची पाकिटे आढळणे अत्यंत गंभीर असून संबंधितांवर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)

‘बी.व्ही.जी.’ आस्थापन आणि मंदिर समितीचे स्वच्छता विभागाचे विभागप्रमुख यांना नोटीस बजावली ! – प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

या प्रकाराची ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’ने गंभीर नोंद घेतलेली असून ‘बी.व्ही.जी.’ आस्थापन आणि मंदिर समितीचे स्वच्छता विभागाचे विभागप्रमुख दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. मंदिर परिसरात सध्या फेरीवाले, फुगेवाले यांच्यासह अनेक बाहेरच्या लोकांचा वावर वाढला असून त्यातून हा प्रकार झाला असावा. यापुढील काळात असे प्रकार टाळण्यासाठी दर्शन मंडप येथील स्वच्छतागृह हे केवळ भाविकांसाठी उपलब्ध असेल.