ऐतिहासिक महादरे आणि हत्ती तलाव परिसराचे लवकरच सुशोभिकरण ! – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोस

सातारा, २३ एप्रिल (वार्ता.) – सातारा नगर परिषदेच्या ऐतिहासिक महादरे आणि हत्ती तलाव परिसराचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. महादरे येथील नियोजित कामाच्या जागेची पहाणी मंत्री भोसले यांनी केली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक आणि नगरसेवक उपस्थित होते.

मंत्री भोसले पुढे म्हणाले, ‘‘२८ एकर जागेत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ‘वॉकिंग ट्रॅक’ (चालण्याचा मार्ग), बाग, विरंगुळा केंद्र आदी कामे होणार आहेत. याच परिसरातून बाह्य वळण रस्ता (रिंगरोड) जाणार असल्याने या ठिकाणी पर्यटनवृद्धीस साहाय्य होणार आहे. सातारा नगर परिषदेला ‘माझी वसुंधरा अभियाना’मध्ये मिळालेल्या ६ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेतून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. फुलपाखरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या दरेगावात फुलपाखरांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’