एस्.टी. महामंडळाच्या सौर ऊर्जेच्या पहिल्या टप्प्याला मान्यता !

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगार यांच्या छतांवर ‘ग्रीड सोलर’ ऊर्जा प्रणालीद्वारे वीजनिर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. (ग्रीड सोलर प्रकल्प म्हणजे सौर ऊर्जेचे जाळे निर्माण करणे होय.) या अंतर्गत २.५७ मेगावॅट प्रकल्पाला शासनाची संमती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी १३ कोटी ३ सहस्र रुपयांच्या अंदाजपत्रकाला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

‘ग्रीड सोलर’ प्रकल्पामुळे सौरऊर्जेचा उपयोग वाढणार आहे. त्यामुळे एस्.टी. महामंडळाचा प्रतीवर्षी ३ ते ४ कोटी रुपये इतका पारंपरिक वीजेवरील व्यय वाचेल. हा उपक्रम हरित ऊर्जा उपयोगाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा वाचवणे, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही सूत्रे साध्य होतील, असे प्रताप सरनाईक म्हणाले.