साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २२ वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला !

मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जोपासत वाटचाल करणार्या साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २२ वा वर्धापनदिन १९ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वर्ष २०२६ चा पत्रकारितेसाठीचा पुरस्कार अभ्यासू आणि ज्येष्ठ पत्रकार ‘न्यूज २१’ या ऑनलाईन वृत्तपत्राचे मुख्य संपादक अन् संस्थापक श्री. विवेक भावसार यांना देण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार देऊन साप्ताहिक ‘मावळ मराठा’ समूहाकडून त्यांना गौरवण्यात आले.

या वेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्यिक श्री. प्रदीप म्हापसेकर आणि साप्ताहिक ‘मावळ मराठा’चे संपादक श्री. सदानंद खोपकर यांनी सत्कारमूर्ती श्री. विवेक भावसार यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला. श्री. सदानंद खोपकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. या वेळी श्री. सदानंद खोपकर यांनी साप्ताहिक ‘मावळ मराठा’चा २२ वर्षांतील खडतर प्रवास आणि त्याविषयीचे अनुभवकथन केले. सौ. सीमंतिनी सदानंद खोपकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी श्री. सदानंद खोपकर यांच्या ‘रानझुळूक’ या हायकू (जपानी काव्यप्रकार) प्रकाराच्या वाक्यपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या वेळी श्री. संदीप चव्हाण म्हणाले, ‘‘विवेक भावसार यांनी पत्रकारितेमध्ये केलेला संघर्ष साप्ताहिक ‘मावळ मराठा’ ने टिपला आहे. हा पुरस्कार म्हणजे विवेक भावसार यांच्या संघर्षाला मानवंदना आहे. हे पारितोषिक विवेक भावसार यांच्या पत्रकारितेचा सन्मान आहे.’
सत्कारानंतर भावना व्यक्त करतांना श्री. विवेक भावसार म्हणाले, ‘मी विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली. मुंबईमध्ये आल्यावर ज्येष्ठ पत्रकारांकडून मला शिकायला मिळाले. पत्रकारितेविषयी शिक्षण देणारी संस्था मी काढली आहे. या माध्यमातून शोध पत्रकारितेवर माझा भर आहे. या संस्थेतून शोध पत्रकारिता करणारे पत्रकार सिद्ध व्हावेत, यासाठी माझा प्रयत्न आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात सदानंद खोपकर नियमितपणे सभागृहातील वृत्तांकन करतात. या वयातही पत्रकारितेमधील त्यांची धडपड पहाता खरी पत्रकारिता जीवंत असल्याचे जाणवते.’’
या वेळी राही भिडे, श्री. प्रदीप म्हापसेकर आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. राजू झनके यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शैलेंद्र सदानंद खोपकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या वेळी सौ. कृपा शैलेंद्र खोपकर, चि. आश्वी शैलेंद्र खोपकर यांसह साप्ताहिक ‘मावळ मराठा’चे हितचिंतक आणि वाचक उपस्थित होते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !