७७ कोटी रुपयांच्या ‘ऑनलाईन’ गुन्ह्याच्या प्रकरणी गोवा आणि गुजरात येथे धाडी

गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या ‘सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स’ यांनी मोठी कारवाई करत तब्बल ७७ कोटी रुपयांच्या सायबर (ऑनलाईन) फसवणूक करणार्‍या टोळीचे कारनामे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी १६ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे. संशयित ‘म्यूल’ (अवैध निधीचा स्रोत लपवण्यासाठी वापरण्यात येणारे) बँक खात्याच्या माध्यमातून फसवणुकीचे पैसे फिरवत असल्याचे उघड झाले आहे.

गुजरात ‘सी.आय.डी.’ने दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी २६० हून अधिक ‘म्यूल’ बँक खाती सिद्ध करून देशभरातील सायबर गुन्ह्यांतील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरली आहे. या टोळीचा संबंध ३७५ सायबर गुन्ह्यांशी आहे आणि याचा एकूण व्यवहार ७७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत गोवा आणि गुजरातमधील बडोदा अन् पालनपूर येथे धाडी घालण्यात आल्या. त्यात गोवा येथून ९, बडोदा येथून ५ आणि पालनपूर येथून २ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून भ्रमणभाष संच, धनादेश, पासबूक, रिकामे धनादेश, राऊटर, सीमकार्ड, पेन ड्राइव्ह, डेबिट कार्ड आणि क्यूआर कोडसह इतर साहित्य कह्यात घेण्यात आले आहे. संशयित स्वत: आणि इतरांच्या नावावर बँक खाती उघडून त्याची माहिती सायबर फसवणूक आणि ऑनलाईन गेमिंग घोटाळ्यातील सहकारी यांना पुरवत होते. संशयितांनी ३ बनावट आस्थापने उघडून या खात्यांचे जाळे अधिक भक्कम केले होते. संशयितांचे दुबईसह परदेशातील व्यक्तींशी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम यांद्वारे संपर्क असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या नागरिकांसाठी सूचना

१. कोणत्याही परिस्थितीत स्वत:च्या बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.

२. मोबदल्याच्या आमिषापोटी स्वतःचे खाते वापरण्यास देऊ नका.

३. बँक खाते किंवा सीमकार्ड यांची माहिती मागितल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.

४. सामाजिक माध्यमातील जलद लाभाच्या विज्ञापनांपासून सावध रहा.