संपादकीय : स्वरांचे चिरतरुण लेणे !

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका महापर्वाचा अंत झाला. आशाताईंचा ‘महान गायिका आशा भोसले’ बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. जीवनातील आणि कला विश्वातील समस्यांवर धडाडीने मात करत त्या यशाच्या शिखरावर पोचल्या. त्यांनी गायन क्षेत्रात चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये चित्रपटातील सर्व प्रकारच्या भावभावना दाखवणारी गीते, त्यामध्ये प्रेमगीते, गझल, उडत्या चालींची असंख्य गीते यांचा समावेश होता. नाट्यसंगीतापासून ‘कॅब्रे’ गाण्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गायन प्रकारांमध्ये दर्जेदार आणि उत्कृष्ट गाणी देणार्‍या अत्यंत दुर्मिळ गायिका होत्या. गीताद्वारे मानवी मनाचा ठाव घेण्याची दुर्लभ क्षमता आशाताईंच्या गाण्यांमध्ये होती. प्रत्येक भावनेला न्याय देणे, ही गायकाची कसोटी असते. ते सर्वांनाच जमते, असे नाही. त्यामुळे कुणी गझलगायकीपुरता सीमित रहातो, तर कुणी भजनसम्राट होतो. कुणी आलापी गायनाद्वारे नाट्यगीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करतो, तर कुणी तरल भावनांना हात घालणारी केवळ भावगीते गाऊन रसिकांना भावनांच्या विश्वाचा प्रवास घडवून आणतो. आशाताईंचा आवाज प्रत्येक भावनांना न्याय देणारा होता. ‘आईये मेहरबान…’, ज्या शैलीदार पद्धतीने गायल्या, तितक्याच तोडीने ‘पांडुरंग कांती…’ यांसारखे अभंगही गायले…‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, ‘विठ्ठल तो आला आला …’, हे अभंग आपल्यात भक्तीभाव निर्माण करतात, तर ‘ओ हसीना झुल्फोंवाली…’, ‘झुमका गिरा रें’ या उडत्या लयबद्ध चालींची गाणी तितक्याच खट्याळपणे आणि एक प्रकारच्या मस्तीत गायल्यामुळे संगीतप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण करत असत. आशा भोसले आणि सुधीर फडके (बाबूजी) ही मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण जोडी होती, असे म्हणतात. त्यांनी अनेक अजरामर भावगीते आणि चित्रपटगीते रसिकांना दिली आहेत. अष्टपैलू गायकी ही त्यांना मिळालेली निसर्गदत्त देणगी; मात्र त्यासह त्यांनी घेतलेले कष्टही तितकेच महत्त्वाचे !

चिरतरुण आवाज !

गाण्याचे शब्द, गाण्याची चाल, गाण्याचा ताल, गाण्यातील भावना या सर्व गोष्टींचा उत्कृष्ट मेळ घालत आशाताई गाणे गात. चित्रपटाची नायिका आणि चित्रपटातील तिची व्यक्तीरेखा यांच्याशी अत्यंत मिळतेजुळते असे गाणे गाण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘अच्छा जी मैं हारी चलो मान…’, हे मधुबालासाठी गायलेले गाणे जसे मधुबालाचे होऊन जाते, तसेच ‘इजाजत’ चित्रपटामधील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ।’, हे नायिका अनुराधा पटेल हिच्यासाठी गायलेले गाणे तिची व्यथा मांडते. सर्वच गायिकांचे आवाज सर्वच नायिकांना शोभतात, असे नाही; पण आशाताईंचा आवाज गेल्या ६ पिढ्यांतील सर्वच नायिकांना शोभला.. नव्हे तो त्या नायिकांचाच होऊन गेला…याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी अभिनेत्री तनुजा यांच्यासाठी ‘बाग में कली खिली’, हे गाणे वर्ष १९६५ मध्ये तितकेच लोकप्रिय झाले, तर त्यांची कन्या काजोल यांच्यासाठी १९९५ मध्ये गायलेल्या ‘जरासा झुँम लू मैं’ या गाण्यावर तरुण पिढी थिरकली ! दोन्ही गाण्यांमध्ये ३० वर्षांचा कालावधी होता. एकाच गायिकेने आई आणि तिची मुलगी यांच्यासाठी पार्श्वगायन करणे अन् दोन्ही ठिकाणी तो आवाज तितकाच चपखल बसणे, हे त्यांच्या अफाट कौशल्याचे प्रतीक होते. आशाताईंचे वय वाढले; मात्र त्यांचा आवाज ‘वृद्ध’ झाला नाही. वयोपरत्वे त्यांच्या आवाजाची ‘धार’ वाढत गेली. आशाताई केवळ गात नसत, तर त्या आवाजातून अभिनय करत असत. ‘पडद्यावर अभिनेत्री कशी दिसणार आहे ?, तिची देहबोली कशी आहे ?, हे ओळखून त्या त्यांच्या गाण्यात ‘व्यक्त’ होत असत. म्हणूनच त्यांचा आवाज तनुजा यांच्या चंचलपणाला आणि काजोलच्या बिनधास्त व्यक्तीमत्त्वाला सारखाच साजेसा ठरला.

धडाडीच्या गायिका !

आशा भोसले यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. त्या गर्भवती असतांना त्यांच्या पहिल्या पतीने त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी स्वकष्टाने मुलांना वाढवले, तसेच गायनक्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. ज्या काळात स्त्रीकडे केवळ ‘चूल आणि मूल सांभाळणारी’ म्हणून पाहिले जात होते, त्या वेळी त्यांनी मिळवलेले यश म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यांचा मुलगा हेमंत यांचे कर्करोगाने निधन झाले, तर मुलगी वर्षा भोसले यांनी आत्महत्या केली. ३ वर्षांच्या कालावधीत त्यांनी दोन्ही मुलांना गमावले, हा त्यांच्यासाठी मोठा आघात होता; मात्र त्या डगमगल्या नाहीत. उलट त्या अधिक कणखर, शांत आणि संयमी होत गेल्या. त्या आयुष्य खर्‍या अर्थाने जगल्या. त्यांचे आयुष्यावर प्रेम होते. किंबहुना यामुळेच त्यांच्या गाण्यात जो रसरशीतपणा किंवा उत्साह ओसंडून वहातो, त्यामागे त्यांना आयुष्य जगण्याची जी कला उमगली होती, तेच कारण आहे. त्यांनी पराभव मानला नाही आणि संघर्ष करायला कधी मागे हटल्या नाहीत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्यावरील आघातांचे कधीही भांडवल केले नाही किंवा त्याद्वारे लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी जे यश संपादन केले, ते स्वबळावर !

‘सूरसम्राज्ञी’ आशा भोसले आणि ‘गानकोकिळा’ लता दिदी (मंगेशकर)

‘सहसा मोठ्या वृक्षाच्या छायेखाली लहान झाडांची वाढ खुंटते’, असे म्हटले जाते; परंतु मंगेशकरांच्या घराण्यातील लतादीदी नावाच्या वटवृक्षासमान पवित्र, निखळ आणि घनदाट अशा स्वरवृक्षाच्या छायेत राहूनही आशाताईंनी स्वतःचा स्वतंत्र, बहरलेला अन् मोठ्या वृक्षाच्या मोठेपणाच्या अगदी समीप असलेला असा दुसरा स्वरवृक्ष उभा केला. या दोन्ही स्वरवृक्षांच्या आल्हाददायक छायेखाली केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमींनी ७ दशकांहून अधिक काळ मनमुराद स्वरानंद अनुभवला. आशाताईंना ‘अष्टपैलू’ गायिका म्हणून कारकीर्द घडवण्यात संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आर्.डी. बर्मन यांचाही मोठा वाटा आहे, हेही येथे नमूद करावेसे वाटते.

आशाताईंचे गाणे कधी संपत नाही, तर ते आपल्या मनात, आठवणीत आणि ओठांवर कायम रहाते. ‘आशा भोसले’ हे केवळ एका गायिकेचे नाव नव्हते, तर तो सुरांचा सुंदर प्रवास होता. या प्रवासात त्यांनी कानसेनांना (संगीत रसिकांना) अक्षरशः सुरांनी न्हाऊ घातले. हा प्रवास लौकिक अर्थाने संपला असला, तरी हे नाव भारतीय संगीताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. ‘सनातन प्रभात’च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

अष्टपैलू गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या आशाताईंचा संघर्षमय प्रवास नवोदित गायकांसाठी प्रेरणादायी !