वारकरी संप्रदायाविषयी शरद पवार यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वारकरीविरोधी विचार मांडणार्‍यांचा शहरी नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप !

देवेंद्र फडणवीस व शरद पवार

मुंबई – वारकरी संप्रदायाविषयी शरद पवार यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा आहे. मला दुःख आहे की, शरद पवार यांनी अशा प्रकारचा लेख लिहिला. शरद पवार यांचा पिंड निधर्मी आहे. ते धर्म मानत नाहीत, असे त्यांनीच अनेक वेळा मान्य केले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ योग्य माहिती नसावी, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ते म्हणाले,

१. वारकरी संप्रदायात काही लोक शिरून वारकरी विचारांच्या विरुद्ध विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते. अशांना वारकरी संप्रदायाने बाहेर काढले. ज्या लोकांना वारकरी संप्रदायाने झिडकारले, त्या लोकांचा संबंध आम्हाला शहरी नक्षलवादाच्या संदर्भात पहायला मिळाला. त्या संदर्भातील धारिकाही माझ्याकडे आहे.

२. वारकरी संप्रदायाची सहस्रो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. वारकरी विचार हा श्रद्धा आणि बंधुता यांचा विचार आहे. भागवत धर्माची पताका घेत ‘प्रत्येक व्यक्तीच्या मनाची शुद्धता झाली पाहिजे’, असा विचार करणारा, तसेच पर्यावरणाशी साधर्म्य साधणारा असा विचार आहे.

३. वारकरी विचारांच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायात विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांची सूची मी त्यांना पाठवून देतो.