आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (९.४.२०२६)

थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या

एस्.टी.ची भाडेवाढ !

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची (एस्.टी.ची) १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी भाडेवाढ केली जाणार आहे. भाड्यात १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल वाढवणे आणि सेवा सुरळीत ठेवणे यांसाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. या भाडेवाढीतून त्रैमासिक आणि मासिक विद्यार्थी पासधारकांना वगळण्यात आले आहे.


‘अमृतभारत’  रेल्वेमुळे गर्दी !

पनवेल – रेल्वेस्थानकातून ‘अमृतभारत’ ही बंगाल आणि आसाम या राज्यांत जाणारी गाडी प्रतिसोमवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी चालू करण्यात आली आहे. या गाडीत चढण्यासाठी महाराष्ट्रात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांची पुष्कळ गर्दी होते. त्यामुळे पनवेल स्थानकावरील नेहमीची सकाळची गर्दी आणि ही गर्दी मिळून गर्दी वाढते. रेल्वेस्थानकाच्या विस्ताराचे कामही सध्या चालू असल्याने अडचण होते. त्यामुळे या काळात चेंगराचेंगरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.


व्यापार्‍याची सोनसाखळी चोरली !

पनवेल – कळंबोली स्टील बाजाराच्या परिसरात दुपारच्या वेळी दुचाकीवरून जाणार्‍या ५५ वर्षीय व्यापार्‍याचा पाठलाग करून चोरांनी भर दिवसा ३ लाख रुपयांची सोन्याची साखळी हिसकावली. या झटापटीत व्यापार्‍याच्या मानेला दुखापत झाली. सोनसाखळी चोरीत आता पुरुषांनाही लक्ष्य केले जात असल्याची परिसरात चर्चा आहे.


‘मिसिंग लिंक’ पुलाच्या चाचण्या चालू !

मुंबई – मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा बहुप्रतिक्षित प्रकल्प मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. सध्या या मार्गावर तो किती वजन घेऊ शकतो, याचे परीक्षण करण्यात येत आहे. सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यावर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतून पुण्याकडे जाणार्‍या आणि पुढे पश्चिम महाराष्ट्र येथे जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.


ठाणे रेल्वेस्थानक परिसरात नशा करणारा मुसलमान अटकेत !

ठाणे – येथील रेल्वेस्थानक परिसरात गांजा आढळलेल्या अजमल शेख (वय २२ वर्षे) याला कह्यात घेतले. त्याच्याकडे गांजाचे पाकिट, चिलीम आदी वस्तू आढळून आल्या. तो गांजाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.