भगवंताचे नामच कलियुगाचा आधार !  – आनंदमयी केशव प्रभू, प्रचारक, इस्कॉन

  • दहिसर येथे हिंदु संमेलन !

  • मान्यवरांचे संबोधन !

डावीकडून सौ. मेधावी नातू, श्री. वासुदेव कामत, श्री. आनंदमयी केशव प्रभू, श्री. सतीश कोचरेकर,
ज्येष्ठ अधिवक्ता लालजी त्रिपाठी

दहिसर (मुंबई) – भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोत्तम स्थान आहे. मातेमुळे आपले अस्तित्व आणि उत्कर्ष साधला जातो. जिजामाता, माता जनाबाई, माता मीराबाई आपल्या आदर्श आहेत. जिजामाता यांनी छत्रपती शिवबांना घडवून राष्ट्र आणि धर्मरक्षण केले, संत जनाबाई आणि संत मीराबाई यांनी आपल्याला अध्यात्म शिकवले. आपली माता, गोमाता, गंगामाता आणि भारतमाता यांचा सन्मान राखण्यासाठी भगवंताच्या नामासह हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. भगवंताचे नाम हे कलियुगाचा आधार आहे, असे मार्गदर्शन श्री. आनंदमयी केशव प्रभू यांनी केले. येथील ‘अशोकवन सांस्कृतिक मंडळा’च्या मैदानात या दिवशी सकल हिंदू समाज आणि ‘हिंदु नववर्ष स्वागत समिती’ यांच्या वतीने आयोजित संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाचा प्रारंभ सुश्राव्य भजनाने झाला. नंतर संपूर्ण वन्दे मातरम् आणि देशभक्तीपर गीत गाण्यात आले, तसेच ‘इस्कॉन’च्या साधकांनी कीर्तन केले. ‘इस्कॉन’चे प्रचारक श्री. आनंदमयी केशव प्रभू, पद्मश्री विभूषित प्रसिद्ध चित्रकार श्री. वासुदेव कामत, ज्येष्ठ अधिवक्ता लालजी त्रिपाठी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर आणि चौगुले महाविद्यालयच्या माजी मुख्याध्यापिका सौ. मेधावी नातू या मान्यवरांनी उपस्थित हिंदूंना संबोधित केले.

संमेलनाला विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी, भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर उपस्थित होते. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संस्था यांनी त्यांचे प्रदर्शन कक्ष लावले होते. राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता झाली.

‘हिंदु’ या नात्याने ठामपणे उभे रहा ! – अधिवक्ता लालजी त्रिपाठी 

हिंदु धर्मातील जाती-पातीतील भेदाचा शत्रूला लाभ मिळत आहे. जात, भाषा, प्रदेश असे भेद विसरून हिंदु आणि हिंदु संस्कृती यांचे रक्षण करणार्‍यांच्या पाठीशी ‘हिंदु’ या नात्याने ठाम उभे राहिलो, तरच आपण टिकू शकतो.

पुढील पिढ्यांना ‘रामायण’ वाचायला प्रवृत्त करा ! – वासुदेव कामत, प्रसिद्ध चित्रकार 

हिंदूंचे संघटन हीच हिंदूंची शक्ती आहे. जोपर्यंत सिंह इतिहास लिहित नाही, तोपर्यंत शिकार्‍यांनी लिहिलेला इतिहास वाचवा लागतो. आपल्या पुढच्या पिढ्यांना काल्पनिक कादंबर्‍या वाचण्यापेक्षा ‘रामायण’ वाचायला प्रवृत्त करा, त्यामध्ये चरित्र घडवण्याचे सामर्थ्य आहे.

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी प्रयत्न करा ! – सौ. मेधावी नातू, माजी मुख्याध्यापिका 

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदूंच्या संघटनासाठी संघाने सांगितलेली सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वभाव जागरण आणि नागरिक कर्तव्य या पंचपदीचा अवलंब केला, तर आपल्याला भारताला विश्वगुरुपदी नेता येईल.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी सांगितले, ‘‘धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी साधना अन् धर्माचरण करून ईश्वराचे आशीर्वाद मिळवले पाहिजेत.’’

वैशिष्ट्यपूर्ण !

१. ‘राष्ट्रसेविका समिती’च्या भगिनींनी लाठीची प्रात्यक्षिके सादर केली.

२. ‘अंबिका योग कुटीर’च्या साधकांनी विविध आसने सादर केली.