महाविद्यालय हे चारित्र्य घडवण्याचे केंद्र आहे ! – प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ

रत्नागिरी – शिक्षणाने विषमता जाऊन समानता आली पाहिजे. शिक्षणामध्येच बदलाची ताकद आहे. समाज परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहा. विद्यार्थ्यांनी पालकांच्या त्याग आणि समर्पण यांविषयी कृतज्ञता ठेवली पाहिजे. महाविद्यालय हे चारित्र्य घडवण्याचे केंद्र आहे. युवक ही देशाची संपत्ती असून नव्या तंत्रज्ञानाला धाडसाने सामोरे जाऊन कर्तृत्व सिद्ध करा आणि देशाची अर्थव्यवस्था सक्षम करा. रोजगारासाठी ज्ञान कौशल्य आणि आत्मविश्वास यावर स्वार होऊन प्रगती साधा, असे प्रतिपादन डॉ. पदवीदान समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापिठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ ‘डॉ. ज.शं. केळकर सेमिनार हॉल’मध्ये ४ एप्रिलला झाला. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या धोरणाची प्रासंगिकता डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले पाहिजे. त्याकरता गोगटे महाविद्यालयाने पदवीच्या विद्यार्थ्यांना किमान ६० तासांचा कोर्स चालू करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन अध्यक्षस्थानी, सहसचिव श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे उपस्थित होते.

८१८ जणांना पदवी

प्रास्ताविकात डॉ. विवेक भिडे यांनी मागील वर्षांच्या परीक्षेचा मागोवा घेतला. मार्च एप्रिल २०२५ मध्ये विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या ८१८ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापिठाची पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले.

क्षमता ओळखून स्वतःचा विकास करावा !

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील पदवीदान समारंभ हा एक आनंदी क्षण आहे. कष्ट, चिकाटी, जिद्द हेच यशाचे गमक आहे. विद्यार्थ्यांनी नवीन काम, दायित्व स्वीकारण्याची भविष्यात आवश्यकता आहे. महाविद्यालयातील संस्कार घेऊन आयुष्याची वाटचाल करावी. क्षमता ओळखून स्वतःचा विकास करावा.


होकार आणि नकार पचवायला शिका !

कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी मातृ, पितृ आणि गुरु यांविषयी कृतज्ञ असावे, असे सांगितले. तसेच वर्तमानात आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे ते सक्षमपणे करा, तरच आपण आनंदी रहाल. आपल्या शरीराची काळजी घ्या. ते आनंदीपणाचे गमक आहे. त्याचसमवेत आपल्या मनाची ताकद वाढवा. होकार आणि नकार पचवायला शिका. लोकांचे भले करण्याचा प्रयत्न करा. चांगुलपणाच्या चक्रात सामील व्हा.

प्रातिनिधिक स्वरूपात २८ पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र, महाविद्यालय प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, पदवी प्राप्त विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

२ प्राध्यापकांना पी.एचडी.

डॉ. स्वप्नील जोशी आणि डॉ. मंगेश भोसले यांना वाणिज्य अन् व्यवस्थापन शास्त्रातील पी.एचडी. पदवी प्रदान करण्यात आली. या दोघांनीही मनोगतामध्ये संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, कुटुंब, तसेच मार्गदर्शिका डॉ. यास्मिन आवटे यांचा उल्लेख करून आभार मानले. कार्यक्रमाला शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.