Mid Day Meal Scam : मदरशांनी विद्यार्थ्यांच्या माध्यान्य आहार योजनेतील निधी हडपला !

उत्तरप्रदेशातील ५५८ मदरशांवर होणार कारवाई !  

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील योगी सरकारने मदरशांमधील अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील ५५८ मदरशांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहार योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे समोर आले आहे. मदरशांनी विद्यार्थ्यांच्या माध्यान्य आहार योजनेतील निधी हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माध्यान्ह आहार प्राधिकरणाच्या संचालिका मोनिका राणी यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

अखिल भारतीय पसमांदा समाज मंचाने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या मंचाने सरकारला कळवले की, मदरशांमध्ये कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवली जाते. तसेच विद्यार्थ्यांपर्यंत अन्नधान्य आणि निधी पोचत नाही. सरकारी निधीचा अपहार करून तो वैयक्तिक लाभासाठी वापरला जात आहे. या तक्रारीची नोंद घेऊन सरकारने चौकशीचा आदेश दिला आहे. सरकारी अधिकारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पडताळणी करतील, तसेच निधीच्या वाटपाचा आणि प्रत्यक्ष माध्यान्य आहार घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येचा ताळमेळ पडताळला जाईल. योगी सरकार मागील काही काळापासून मदरसा शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

अशा मदरशांवर सरकार तात्काळ बंदी का घालत नाही ?