पुणे येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण पालटणार !

भवानी पेठेतील ‘पालखी विठोबा मंदिरा’तील मुक्काम पालटणार

आळंदी – माऊलींच्या पुण्यातील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अपुरी जागा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणि गैरसोय, स्वच्छतागृहांचा अभाव, अरूंद रस्ते आणि होणारी वाहतूककोंडी या सर्वांचा विचार करून यंदा पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम अन्यत्र घेण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात २८ मार्च या दिवशी ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटना’ आणि ‘आळंदी देवस्थान’ यांच्यात बैठक झाली. पुण्यातील २ दिवसांच्या पालखी मुक्कामाला अन्यत्र पर्यायी जागा कोणती ? याचा अंतिम निर्णय १३ एप्रिल या दिवशी घोषित करण्यात येईल, अशी माहिती ‘आळंदी देवस्थाना’चे पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता राजेंद्र उमाप यांनी दिली.

उमाप म्हणाले, ‘‘आळंदीहून पंढरपूरला जातांना पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्काम न करण्याचा निर्णय घेतला, तरी परतीच्या प्रवासात पुण्यात या ठिकाणी मुक्काम करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून केवळ पालखी सोहळ्यात दिंड्यांसमवेत चालणार्‍या वारकर्‍यांचा विचार आळंदी देवस्थान करत आहे.’’