छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसअभावी रिक्शाचालक हवालदिल !

प्रशासकीय अनास्थेमुळे वाहतूकव्यवस्था कोलमडली !

प्रतिकात्मक इमेज

छत्रपती संभाजीनगर – शहरात गॅसचा (‘ऑटो एल्.पी.जी.’चा) प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ही इंधनटंचाई आणि अवाजवी शुल्कवाढ यांच्या निषेधार्थ शहरातील रिक्शाचालकांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूकव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली आहे. घंटोन्‌घंटे रांगेत थांबूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या रिक्शाचालकांनी ३० मार्च या दिवशी शहरात भव्य मोर्चा काढून प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी ! 

शहरात एकूण २५ सहस्र रिक्शा असून त्यांपैकी अनुमाने १५ सहस्र रिक्शा द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एल्.पी.जी.) आणि नैसर्गिक वायूवर (सी.एन्.जी.) चालतात. गॅस उपलब्ध नसल्याने या रिक्शा रस्त्यावर दिसत नाहीत. रिक्शा उपलब्ध नसल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. बसमध्येही जागा नसल्याने वृद्ध, महिला आणि बालके यांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे.

अशी आहे शहराची स्थिती 

  • शहरातील एकूण रिक्शा – २५ सहस्र
  • केवळ पेट्रोलवर चालणार्‍या रिक्शा – १० सहस्र ५२६
  •  एल्.पी.जी. + पेट्रोलवर चालणार्‍या रिक्शा – ९ सहस्र ५००
  • केवळ एल्.पी.जी.वर चालणार्‍या रिक्शा – ३ सहस्र ८८१
  • सी.एन्.जी.वर चालणार्‍या रिक्शा – १ सहस्र ९६

मंत्र्यांचा संताप आणि अधिकार्‍यांचा उद्दामपणा !

या गंभीर विषयावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना विचारले असता ‘गॅस आस्थापनांचे अधिकारी आमचे दूरभाष उचलत नाहीत’, असे उत्तर त्यांनी दिले. यावर संताप व्यक्त करत पालकमंत्री शिरसाट यांनी आदेश दिले की, जर पंपचालक आणि आस्थापने उद्दामपणे वागत असतील, तर त्यांची ‘एन्.ओ.सी.’ (ना हरकत प्रमाणपत्र) तात्काळ रहित करा !

२ दिवसांत तोडगा न निघाल्यास ‘चक्काजाम’ची चेतावणी !

‘जर येत्या २ दिवसांत गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर शहरात तीव्र ‘चक्काजाम’ (चाकबंद) आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी रिक्शाचालक संघटनांनी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. गॅस पंप २४ घंटे चालू ठेवावेत आणि इंधन भरल्याची अधिकृत पावती मिळावी, अशी रास्त मागणीही रिक्शाचालकांनी केली आहे.

२ दिवस गॅसचा पुरवठा नाही ! 

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी पेट्रोलपंपांची पहाणी केली असता शहरातील सर्व पंपांवरील गॅस साठा संपल्याचे समोर आले. विशेष म्हणजे पुढील २ दिवस हा पुरवठा सुरळीत होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.