समभाग बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

 

सावंतवाडी – समभाग बाजारात गुंतवणुकीचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पसार असलेला मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडी येथील भव्य बंगल्यावर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने २४ मार्च या दिवशी कारवाई केली. पोलिसांनी बंगल्याचा पंचनामा करून मालमत्ता जप्त केली. ठाण्यातील सचिन राणे, प्रीती राणे आणि सावंतवाडी येथील सागर कारिवडेकर यांनी मिळून शेअर ट्रेडिंग आस्थापनाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले. ही टोळी सावंतवाडीसह पुणे आणि ठाणे यांसारख्या महानगरांपर्यंत पसरलेली होती. ठाण्यात हा घोटाळा उघड झाल्यानंतर अन्वेषणाची चक्रे वेगाने फिरली. या पार्श्‍वभूमीवर ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावंतवाडी शहरात येऊन कारिवडेकर याच्या मालमत्तेवर कारवाई केली. ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने बंगल्याचा पंचनामा केला आणि बंगल्याला कुलूप लावून दारावर जप्तीची नोटीस लावली. सद्य:स्थितीत कारिवडेकर पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.