गोव्यात घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधन यांची टंचाई नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

जनतेने घाबरून जाऊन खरेदी करणे टाळावे

पणजी, २५ मार्च (वार्ता.) – गोवा  राज्यात घरगुती गॅस आणि इंधन यांची कमतरता नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला दिले आहे. नागरिकांनी घाबरून खरेदी करून साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘घरगुती ग्राहकांना त्यांचे गॅस सिलिंडर आरक्षण केल्यानंतर १५ दिवसांच्या आत मिळतील. व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी, त्यांच्या वापराच्या आधारे २० टक्के वाटा (कोटा) आधीच देण्यात आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर ग्राहकांनी पीएन्जी (पाईपड् नॅचरल गॅस – वाहिनीतून पुरवठा केला जाणार नैसर्गिक वायू) जोडणीसाठी अर्ज करावा. असे केल्यावर ते अतिरिक्त २० टक्के वाट्यासाठी पात्र असतील. नागरी पुरवठा सचिव गॅस सिलिंडर विक्रेत्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही तक्रारी आल्यास ग्राहक थेट नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधू शकतात.’’

व्यावसायिक गॅस सिलिंडरांचा तुटवडा हॉटेल व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सध्या राज्याच्या वतीने केवळ २० टक्के व्यावसायिक सिलिंडरांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. उपाहारगृहे पर्यटकांनी भरलेली असतांना गॅसचा साठा संपल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत. काही ठिकाणी काळ्या बाजारात एका सिलिंडरसाठी ५ ते ७ सहस्र रुपयांची मागणी केली जात असल्याचे समजते. नागरी पुरवठा खात्याने याविषयी कडक पावले उचलली आहेत.

खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ

इंधन आणि गॅसच्या संकटामुळे खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे. अनेक उपाहारगृहांच्या मालकांनी आता पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून चुलीवर जेवण करण्यास प्रारंभ केला आहे. गॅसची बचत करण्यासाठी वारंवार गॅसचा वापर करावे लागणारे खाद्यपदार्थ अनेक ठिकाणच्या पदार्थांच्या सूचीतून वगळले गेले असून केवळ जेवणाचे ताट किंवा बिर्याणीसारखे अन्नपदार्थ उपलब्ध आहेत.

गोव्यात ८ दिवसांसाठी पुरेसा पेट्रोलचा साठा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी – गोव्यात सध्या पुढील ८ दिवस टिकेल एवढा पुरेसा पेट्रोलसाठा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सध्या चालू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे संभाव्य टंचाईच्या चिंतेविषयी सांगितले. या समस्येचे निराकरण करतांना सावंत म्हणाले, ‘‘राज्यभरातील अनेक पेट्रोलपंपांबाहेर १ किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. लोक घाबरून इंधन साठवण्यासाठी गर्दी करत आहेत. सरकारने पुरेसा इंधनपुरवठा सुनिश्चित केला आहे, त्यामुळे जनतेने घाबरून पेट्रोल खरेदी करणे टाळावे. राज्यात पुढील ८ दिवसांसाठी पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्यानंतरही आवश्यक साठा ठेवला जाईल. पुढील ८ दिवसांत पुरवठ्याची स्थिती सुधारेल आणि सध्याच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील.’’

राज्यभरातील पेट्रोलपंपांवर नागमोडी रांगा पहायला मिळत आहेत आणि सध्या चालू असलेल्या युद्धामुळे इंधनटंचाईची शक्यता गृहित धरून लोक घाबरून इंधनाची खरेदी आणि साठवणूक करत आहेत.

 इंधन टंचाईच्या अफवेमुळे गोव्यात धावपळ

पंतप्रधान मोदी यांनी आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थितीविषयी केलेल्या विधानांचा चुकीचा अर्थ काढून नागरिक भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे २४ मार्चच्या रात्रीपासून राज्यातील पेट्रोलपंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पहायला मिळत आहेत. कळंगुट, बागा यांसारख्या किनारी भागांत वाहनांच्या १०० ते २०० मीटर लांब रांगा रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.