भोंदू अशोक खरातने आमदार जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली !

  • भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप

  • शरद पवार गटातील नेत्यांचा खरा चेहरा समोर आला !

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील

मुंबई – स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे शरद पवार गटाचे नेते तथा आमदार जयंत पाटील हे भोंदू बाबा अशोक खरात याच्या संपर्कात होते. खरातने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २५ मार्च या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला. खरातने नरबळी दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी अन्वेषण चालू केले असून ‘जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घातली, ते रक्त कुणाचे होते, हे समोर आले पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आमदार पडळकर म्हणाले की, आमदार जयंत पाटील स्वत:च्या पुत्रासह खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरात गेले होते. जे नेते जाहीरपणे देवधर्म मानत नसल्याचे सांगतात, ते अशा भोंदूबाबांच्या चरणी कशासाठी गेले होते ? गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात हा जयंत पाटील यांच्या घरी पूजा सांगत असे, हे संपूर्ण ईश्वरपूरला ठाऊक आहे. अशा वासनांध व्यक्तीला राजाश्रय का दिला ? खरातच्या गावासाठी ४० कि.मी.ची पाण्याची जलवाहिनी देण्यात आली. यामध्ये जयंत पाटील यांचा मोठा सहभाग होता.