श्रीक्षेत्र वढू (ता. शिरूर) आणि तुळापूर (ता. हवेली) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

छत्रपती संभाजी महाराज

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र वढू (तालुका शिरूर) आणि तुळापूर (तालुका हवेली) येथे भगवे झेंडे, दिंड्या, पताका यांसमवेत शंभूराजांच्या जयघोषात शंभूभक्तांच्या गर्दीने श्रीक्षेत्र वढू अन् तुळापूर परिसर सकाळपासून फुलून गेला होता. सकाळी १० नंतर गर्दी पुष्कळ प्रमाणात वाढली.

पहाटे ५ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीवर महाअभिषेक करण्यात आला. मूक पदयात्रेनंतर ८.३० वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. सकाळी ९ वाजता ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता प्रतिज्ञा आणि वेद मंत्रोच्चारात गृह विभाग मानवंदना, माजी सैनिक मानवंदना, शस्त्र पारंगत मानवंदना देण्यात आली. छत्रपती शंभूराजांच्या समाधीस्थळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी १२.३० वाजता धर्मसभेस प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्य परिषद, हवेली पंचायत समिती, श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी केले. श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंच आणि वढू बुद्रुक ग्रामपंचायत अन् ग्रामस्थ यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शंभूराजांचे वंशज वृषालीराजे भोसले उपस्थित होते.