शिपाई नीरज जाधव पोलिसांच्या कह्यात

लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात अटकेचे प्रकरण !

अशोक खरात

नाशिक – मिरगाव येथील २०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणारा आणि स्वतःला अंकशास्त्राचा अभ्यासक म्हणवणारा, मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी (कॅप्टन) अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केले. ते व्हिडिओ त्याच्या कार्यालयातील शिपाई नीरज जाधव यांनी मिळवले आणि त्या बदल्यात त्याच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खरात यांनी तक्रार केल्यावर जाधव याने संबंधित महिलांना व्हिडिओ पाठवून पैसे मागितले. या प्रकरणी नीरज जाधव याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. खरात यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. हे प्रकरण राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरापूर्वीच पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

खरातने महिलांवर अत्याचार केल्याचे ५८ व्हिडिओ जाधव याने चोरले होते. २८ वर्षीय महिलेचा व्हिडिओ त्याने पाठवल्यावर तिच्या मेहुण्याने तिला तक्रार देण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे खरातचे बिंग उघड झाले. यापूर्वी एका महिलेने खरात विरोधात तक्रार करूनही शिर्डी पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

खरात हा मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर न्यासाचा अध्यक्षही आहे. यापूर्वी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांसमवेत त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या शेतातील घरात पिस्तुल, काडतूस आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. त्याच्यावर मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांना गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद आहे. अश्लील व्हिडिओंद्वारेही तो महिलांकडून पैसे घेत होता. त्याच्यावर बलात्काराचेही आरोप आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर यांचा त्याच्यासमवेतचा व्हिडिओ प्रसारित झाला. ‘कुणालाही पाठीशी घालणार नाही, निष्पक्ष आणि कठोर कारवाई केली जाईल’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी म्हटले. ‘अध्यात्माच्या नावाखाली चाललेला नंगानाच खपवून घेणार नाही’, असे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी म्हटले.