डगमगणार्‍या जगाला ‘धर्मा’चा आधार देऊन समतोल राखणे, हे भारताचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

  • प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे नागपूर येथे वक्तव्य

  • सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही ईश्‍वरेच्छा असल्याने भारताचे उत्थान आवश्यक !

  • युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ऋषिमुनींच्या कृपेने सर्वांना जोडणारे तत्त्व भारताकडे आहे !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नागपूर – सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही ईश्‍वराची इच्छा आहे. यासाठी भारताचे उत्थान होणे आवश्यक आहे. संपूर्ण जग आज डगमगले आहे. स्वार्थ आणि वर्चस्व यांसाठी युद्धे चालू आहेत. मूळ धारणा आणि विचार चूक असल्याने हे सगळे चालू आहे. सर्वांना एकत्र जोडणारा धागा कुणाकडेच नाही. जगाला संघर्षाची नव्हे, तर सलोख्याची आवश्यकता आहे. आमचे ऋषिमुनी आणि पूर्वज यांच्या कृपेने सर्वांना जोडणारे तत्त्व केवळ भारताकडे आहे. सध्या जगभरात चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भारताकडेच याचे उत्तर आहे. शांतता हेच भारताचे मूळ स्वरूप आहे. डगमगत असलेल्या जगाला ‘धर्माचा’ भक्कम आधार देऊन त्यात पुन्हा समतोल प्रस्थापित करणे, हे भारताचे दायित्व आहेे, असे वक्तव्य प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे केले.

प.पू. सरसंघचालकांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. भारतातील लोक मानवतेच्या नियमांचे पालन करतात, तर उर्वरित जग शक्तीच्या कायद्याचे पालन करते. डगमगत असलेल्या या जगाला धर्माचा आधार देऊन त्यात पुन्हा समतोल निर्माण करणे, हेच आमचे कार्य आहे.

२. भारत हा मानवतावादावर विश्‍वास ठेवतो, तर इतर लोक अस्तित्वासाठीचा संघर्ष करतात. ‘जो सर्वांत समर्थ, तोच टिकेल’ या तत्त्वावर जगाचा विश्‍वास आहे. दुसर्‍यावर राज्य करणे, ही मुळात स्वार्थी वृत्ती आहे. स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्ववादातून जगामध्ये संघर्ष चालू आहे.

३. युद्धाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न २००० वर्षांपासून चालू आहे; पण त्याचे उत्तर कुणालाही मिळाले नसून वादविवाद आणि कट्टरता अधिक तीव्र होत आहे. सर्व समस्या जशाच्या तशा आहेत. वाद वाढतच चालला असून जग विनाशेच्या छायेत उभे आहे.