पुणे येथे संस्कृत भाषेवरील ई-अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव !

सौ. स्मृती खाडिलकर यांना ताम्रपट देतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी आणि वेदमूर्ती श्री. विवेक गोडबोले

पुणे, १९ मार्च (वार्ता.) – महामहोपाध्याय (म.म.) वासुदेवशास्त्री अभ्यंकर संस्कृत पाठशाळा आणि ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भाषाभ्यास – संस्कृत प्रावीण्याचा मार्ग’ या संस्कृतच्या ई-अभ्यासक्रमातील ‘स्तर १ – भाषाङ्कुरः’ यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, तसेच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला ताम्रपत्र प्रदान करण्याचा समारंभ १५ मार्च या दिवशी येथील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा आरंभ वैदिक मंत्रोच्चारांनी झाला. त्यानंतर ब्राझीलमधील प्राध्यापक मॅथ्यूज फ्रायमर यांनी केलेल्या ‘मंगलाचरण’ या संस्कृत श्लोकाच्या उच्चारणाचा व्हिडिओ (चलचित्र) दाखवण्यात आला. या ई-अभ्यासक्रमात सहभाग नोंदवलेल्या विविध वयोगटांतील यशस्वी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात प्राप्त ज्ञानाचे सादरीकरण केले.

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी सौ. स्मृती खाडिलकर, श्री. श्लोक, सौ. कोमल, कु. प्रार्थना पाठक यांनी मंगलाचरणातील श्लोकाचा अर्थ स्पष्ट करून उपस्थितांना त्यामागील भावार्थ सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कात्रे यांनी केले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौ. स्मृती खाडिलकर या ताम्रपत्राच्या मानकरी ठरल्या, तसेच सौ. कोमल सामंत, श्री. श्लोक देशपांडे आणि कु. प्रार्थना महेश पाठक या विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळवल्याविषयी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटरूपी रक्कम देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि संस्कृतप्रेमी उपस्थित होते.

भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘केंद्रीय सांस्कृतिकमंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत आणि केंद्रीय वित्तमंत्री सौ. निर्मला सीतारामन् यांनी पुणे येथील प्राचीन संस्थांकडे अधिक लक्ष दिले आहे. सध्याचे शासन हे संस्कृत भाषेला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे आपल्याला कोणतेही साहाय्य हवे असल्यास आम्ही नेहमीच तुमच्या समवेत आहोत, हे लक्षात घ्या !’’

श्री. रोहन कुलकर्णी यांनी सांगितले की, नुसत्या पदवीला महत्त्व न देता विद्येला महत्त्व, मराठी आणि इंग्रजी भाषांमधून पारंपरिक पद्धतीने सखोल अध्ययन, भरपूर सराव आणि नियमित परीक्षण, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, ५० परीक्षा, गुणांनुसार आर्थिक मोबदला आणि ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास ‘ताम्रपट’ असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. हे केवळ पदवीसाठी शिक्षण नसून संस्कृत भाषेचा पाया भक्कम करण्याचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी पुढील वर्ग लवकरच चालू होणार असून अधिक माहितीसाठी ९४०३९८४६५३ या क्रमांकावर संपर्क करावा.

या कार्यक्रमात खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, वेदमूर्ती श्री. विवेक गोडबोले, डॉ. सरोजा भाटे, डॉ. शैलजा कात्रे, प्रा. डॉ. महेश देवकर, डॉ. रोहन कुलकर्णी, म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचे वंशज श्री. माधव अभ्यंकर आणि श्री. शंतनू अभ्यंकर यांसह संस्कृतभाषाप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेले ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे अन्य विद्यार्थी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

श्री. विवेक शास्त्री गोडबोले यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचा व्यापक प्रसार अन् प्रचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘संस्कृत’ या शब्दातील ‘स’ म्हणजे ‘संपूर्ण’ असून अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृतमधील शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात. संस्कृत भाषेचा पाया भक्कम व्हावा यासाठी संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.

श्री. महेश देवकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘संस्कृत भाषेचा अधिक व्यापक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. भाषेतील विचार पवित्र असतात.’’ या वेळी डॉ. सरोजा भाटे यांनीही संस्कृत साहित्य आणि ग्रंथ यांमधून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

कु. प्रार्थना पाठक हिचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करतांना डॉ. सरोजा भाटे

खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचे कु. प्रार्थनाविषयीचे गौरवोद्गार !

‘भाषाङ्कुरः’ पाठ्यक्रमात सनातनची ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. प्रार्थना महेश पाठक हिनेही भाग घेतला होता. ६ महिन्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत ती प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे तिचे सहअध्यायी तिच्यापेक्षा वयाने मोठे होते. या वेळी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी तिचे विशेष कौतुक करत म्हणाल्या, ‘‘कु. प्रार्थना नववीत असून लहानवयातच तिने संस्कृत भाषा शिकण्याचे ध्येय घेतले, याविषयी तिचे विशेष अभिनंदन ! लहानवयातच संस्कृत शिकल्यास अधिक लाभ होईल.’’ व्यासपिठावरील मान्यवरांनी तिचे कौतुक केले.

वरील अभ्यासक्रमासाठी माहिती जाणून घ्या खालील लिंक वर –

https://sanskritseva.org/bhashabhyas-level-1-bhashankur/