पुणेकरांना श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणि सूर्यमणी यांचे दर्शन होणार !

प्रथमच सूर्यमणी आणि पादुका राजवाड्याबाहेर

श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणि सूर्यमणी

पुणे, १६ मार्च (वार्ता.) – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील ‘सूर्यमणी’ आणि त्यांच्या पादुका यांचे दर्शन पुणेकरांना मिळणार आहे. ‘सूर्यमणी’ आणि स्वामींच्या पादुका या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या माध्यमांतून हा दर्शन सोहळा एरंडवणे भागातील डी.पी. रस्त्यावरील ‘सिद्धी साज बँक्वेट’ येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये आरती, अभिषेक, होम-हवन आणि इतर धार्मिक विधी केले जाणार आहेत.

१७ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरा’त ‘सूर्यमणी’ आणि स्वामींच्या पादुका दर्शनासाठी आणण्यात येतील. तेथून ‘लक्ष्मीबाई हलवाई दत्त मंदिर’, अक्कलकोट स्वामी समर्थ मठ, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग येथून हा सोहळा कार्यक्रमस्थळी पोचणार आहे, असेही श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी सांगितले.