मांडवीत कॅसिनोजवळील पाण्यात कोलीफॉर्म जिवाणूंमध्ये २०० टक्क्यांनी वाढ

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेली काही वर्षे मांडवीत नांगरलेल्या तरंगत्या कॅसिनोंच्या जवळील पाण्याचे ५ ठिकाणी नमुने घेतले. या पाण्याच्या पडताळणीत वर्ष २०२२ पासून प्रतिमास पाण्यामध्ये मलजन्य कोलीफॉर्म जिवाणू मर्यादेपेक्षा सातत्याने वाढल्याचे आढळले आहे. काही मासांमध्ये मलजन्य कोलीफॉर्म जिवाणूंच्या प्रमाणामध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले आहे. सरकारने पाण्याच्या नमुना पडताळणीचा अहवाल गोवा विधानसभेत मांडला आहे आणि यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

वास्तविक पाण्यामध्ये मलजन्य कोलीफॉर्म जिवाणू प्रति १०० मि.लि.ला १०० एम्.पी.एन्. (‘मोस्ट प्रॉबेबल नंबर’ म्हणजे पाण्यामध्ये सूक्ष्मजीव प्रमाण पडताळण्याची पद्धत) किंवा त्याहून अल्प असणे आवश्यक आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये काही मास वगळता पाण्यामध्ये मलजन्य कोलीफॉर्म जिवाणूचे प्रमाण १०० ते २०० टक्के अधिक होते. उदा. जुलै आणि डिसेंबर २०२४ मध्ये २ सहस्र ३०० एम.पी.एन्. होते. पाण्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) आहे आणि आम्लता-क्षारता (पी.एच.) स्थिर आहे; मात्र पाण्यामध्ये मलजन्य कोलीफॉर्म जिवाणूंचे प्रमाण अधिक असल्याने मांडवीत प्रक्रिया न केलेले किंवा अंशत: प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडले जाते, हे सिद्ध होते.

कॅसिनोचे सांडपाणी प्रक्रियेसाठी पाटो येथील प्रकल्पात पाठवले जाते ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०२२ मध्ये प्रदूषणामुळे मांडवीचा एक भाग ‘प्रायोरिटी ४’ या श्रेणीत समाविष्ट केला आहे; मात्र त्यानंतर प्रदूषण अल्प झाल्यानंतर मंडळाने सप्टेंबर २०२५ मध्ये मांडवी नदी प्रदूषित नद्यांच्या सूचीमधून हटवली आहे. मांडवीतील सर्व तरंगत्या कॅसिनोंच्या नौकांमध्ये सांडपाणी एकत्र करण्याची टाकी आहे आणि ही टाकी कॅसिनोचे व्यवस्थापन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बंदर कप्तान खाते यांच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रिकामी केली जाते. हे सांडपाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाटो येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात पाठवले जाते. मलनिस्सारण केल्याची नोंद कॅसिनोचे व्यवस्थापन ठेवत असते आणि यावर शासकीय अधिकार्‍यांची देखरेख असते.’’