गोव्यातील ४० वर्षांहून अधिक जुन्या जलवाहिन्या पालटण्याचे काम चालू ! – मंत्री सुभाष फळदेसाई

मंत्री सुभाष फळदेसाई

पणजी, १२ मार्च (वार्ता.) – गोव्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यशासनाने ४० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या २ सहस्र किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या पालटण्याचे काम चालू केल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधासभेत दिली. ते म्हणाले, ‘‘जुन्या जलवाहिन्यांपैकी २७६ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या पालटण्याचे काम सध्या चालू असून सर्व काम येत्या ३ वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल. सध्या राज्यातील केवळ २६ टक्के जनतेला २४ घंटे पाणीपुरवठा होत असून ही स्थिती पालटण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

विधासभेतील प्रश्नोत्तराच्या घंट्याला राज्यात अनेक ठिकाणी ‘हर घर जल’ अंतर्गत नळ असले, तरी तिथे पाणी पोचत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. यावर मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘राज्याला सध्या ६९५ एम्.एल्.डी. पाण्याची आवश्यकता असून प्रत्यक्षात ३३६ एम्.एल्.डी. पाण्याचा पुरवठा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत अतिरिक्त ३२५ एम्.एल्.डी. पाण्याची व्यवस्था केली जाईल. जलवाहिन्यांच्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी ‘फ्लो मीटर’ बसवण्याचीही योजना आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यास जुन्या जलवाहिन्या पालटण्याचे काम पुढील दीड वर्षातही पूर्ण होऊ शकेल.’’

मेगा प्रकल्पांना (मोठे गृहप्रकल्प) पाणी देण्याविषयीच्या वादाविषयी ते म्हणाले, ‘‘सरकारचे पहिले प्राधान्य घरगुती ग्राहकांना असेल. मोठ्या गृहप्रकल्पांना पाण्याची जोडणी देण्यापूर्वी त्या भागातील पाणीपुरवठ्याचे विश्लेषण अभियंत्यांकडून केले जाते. ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या भागात नवीन व्यावसायिक प्रकल्पांना अनुमती दिली जात नाही.’’