विधानसभेत मिराबाग आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाच्या चौकशीचे आदेश

विजय सरदेसाई यांनी क्षमा मागण्याचा सभापतींचा आदेश

गोवा विधानसभा

पणजी, ९ मार्च (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या अभ्यागतांच्या दालनात मिराबाग आंदोलकांपैकी ४ जणांनी बंधार्‍याला विरोध करत घोषणाबाजी करत फलक दाखवले आणि कागद फेकले. या घटनेची चौकशी चालू करण्यात आली आहे, अशी माहिती विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी सभागृहाला दिली.

विजय सरदेसाई यांनी २४ घंट्यांमध्ये सभागृहाची क्षमा मागावी ! – सभापती गणेश गावकर

मिराबाग आंदोलकांनी विधानसभेच्या अभ्यागतांच्या दालनातून निषेधाचे फलक दाखवल्याच्या प्रकरणाशी आमदार विजय सरदेसाई यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे सरदेसाई यांनी २४ घंट्यांत सभागृहाची क्षमा मागावी, असा आदेश सभापती गणेश गावकर यांनी दिला आहे.

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण घटनेचा कट विजय सरदेसाई यांनीच रचला होता. हे ४ जण विजय सरदेसाई यांच्या कार्यालयात जातांना दिसले. अन्वेषण चालू असतांना उपद्रव घडवून आणणारे ४ जण आनंद साजरा करतांना दिसले. ही घटना सभागृहाच्या कामकाजाला आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे विजय सरदेसाई यांनी २४ घंट्यांत सभागृहाची क्षमा मागावी.’’

मिराबाग आंदोलकांना मी अतिरेकी म्हटलेले नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर वाद निर्माण झाल्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मी कुणालाही अतिरेकी म्हटलेले नाही. मी केवळ आमदार वेंझी व्हिएगस यांना ‘विधानसभेत आंदोलन करण्यासारखी अतिरेकी वृत्ती निर्माण करू नका’, असे म्हटले होते.

१४ मार्चला आंदोलकांशी चर्चा करणार ! – जलस्रोतमंत्री शिरोडकर

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मिराबाग आंदोलकांशी १४ मार्च या दिवशी पुन्हा बैठक घेणार असल्याची माहिती दिली. या सूत्रावर भाष्य करतांना फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले ‘‘आंदोलकांना त्यांच्या तक्रारींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले. लोकांना आवाज उठवण्याचा अधिकार आहे. त्यांना विधानसभा आवारात प्रवेश द्यायचा कि नाही हे ठरवणे सभापतींवर अवलंबून आहे.’’