‘तृणधान्य महोत्सवा’ने महिला उद्योजिका पुढे येतील ! – संतोष पाटील, जिल्हाधिकारी

सातारा, ८ मार्च (वार्ता.) – तृणधान्य महोत्सवाने महिलांना स्वावलंबी बनवणे, हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरवले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योजिका पुढे येतील, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले. कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पौष्टिक तृणधान्य महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन शहरातील पोलीस कवायत मैदानावर ९ मार्चपर्यंत चालू असणार आहे.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी अधिकाधिक लक्ष देऊन एकल महिला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनात सहभागी झालेली उत्पादने उत्कृष्ट प्रतीची आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील उच्च प्रतीची उत्पादने, आधुनिक प्रक्रिया उद्योग वाढीसाठीची यंत्रे आणि मार्गदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील बाजारपेठेतील नवीन व्यवसाय संधी, निर्यात प्रक्रिया, अन्नप्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि स्वच्छतेच्या मानांकनाविषयी माहिती, तसेच मिलेट्स (तृणधान्य) प्रक्रिया उत्पादने आणि पौष्टिक पदार्थ यांसह अनेक उत्पादने एकाच छताखाली मिळणार आहेत.’’