
पणजी, ६ मार्च (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थमंत्री या नात्याने गोवा विधानसभेत ६ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता राज्याचा वर्ष २०२६-२७ यासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. पश्चिम आशियातील अलीकडील जागतिक अस्थिरतेचा परिणाम गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रारंभीच सांगितले. वर्ष २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजित एकूण खर्च ३० सहस्र १९५ कोटी रुपये आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत अनुमाने ७.२१ टक्के अधिक आहे. अर्थसंकल्पात एकूण महसूल प्राप्ती २९ सहस्र १८१ कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे आणि यामध्ये १ सहस्र ६६६ कोटी रुपये महसूल अधिशेष अपेक्षित आहे.
| काही ठळक वैशिष्ट्ये
१. मोकाट गुरांच्या व्यवस्थापनासाठी ८ गोशाळा उभारणार २. गोमंतकियांसाठी अयोध्या येथे ‘रामनिवासाचे’ बांधकाम चालू करणार ३. पंढरपूर आणि वालांकिणी येथे भाविकांसाठी निवासव्यवस्था उभारणार ४. नवीन आयुष खाते चालू करणार |
अर्थसंकल्पातील काही महत्त्वाची सूत्रे
१. राज्यातील प्रतिव्यक्ती ‘जीएस्डीपी’ (१ वर्षात राज्यातील नागरिकांनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा यांचे मूल्य) ८ लक्ष १८ सहस्र रुपये असून ती देशात सर्वाधिक आहे.
२. गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून आणखी २ सहस्र ५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
३. पाणीपुरवठा विभागासाठी १ सहस्र ९ कोटी रुपयांचे प्रावधान. हे गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहे. डिचोली, काणकोण आणि कुंकळ्ळी येथे मोठे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. तिसवाडी तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वेर्णा ते बांबोळी मार्गावर स्वतंत्र जलवाहिनी उभारणार.
४. वीज खात्यासाठी ५ सहस्र १०० कोटी रुपये – केंद्राच्या स्मार्ट मीटर योजनेसाठी ४६७ कोटी रुपये राखीव
५. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १ सहस्र ८९७ कोटी रुपये – यापैकी १ सहस्र ३०० कोटी रुपये पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेत.
६. गोवा मलनिस्सारण महामंडळासाठी १९ कोटी ५० लक्ष रुपये
७. पर्यटन विभागासाठी ३८५ कोटी रुपये – मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ
८. अयोध्या येथे ‘रामनिवास’ उभारण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून भूमी खरेदी केली. प्रकल्पाचे काम यावर्षी चालू होणार.
९. नवी मुंबईतील वाशी येथे ‘गोवा यात्री भवन’, तर पंढरपूर आणि वालांकिणी येथे भाविकांसाठी निवास व्यवस्था उभारणार.
१०. शाळकरी मुलींसाठी जैवविघटनशील सॅनिटरी पॅड खरेदीसाठी १ कोटी रुपये
११. दोना पावला येथे महाविद्यालय संकुल – फार्मसी, होम सायन्स, कला (फाईन आर्ट), संगीत, वास्तूविशारद आणि बी.एड्. महाविद्यालय यांचा समावेश असेल.
१२. ‘व्हिजन कुशावती’ या संकल्पनेतून तिसर्या जिल्ह्याविषयी विकास आराखडा मांडणार.
१३. सांखळी आणि धारबांदोडा तालुक्यांत नवीन आयटीआय
१४. खाण खात्यासाठी २६ कोटी रुपये – १२ खाण क्षेत्रे २५२ कोटी रुपये महसूल निर्माण करतात.
१५. राज्यातील १८ वर्षांवरील अपंगांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘दिव्यांग कौशल योजना’
१६. मोकाट गुरांचे व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी ८ गोशाळा स्थापन करणार.
१७. नवीन ‘आयुष’ खाते चालू करणार. राज्यात ‘आयुष’ शिबिरे घेऊन पारंपरिक उपचार पद्धतींना चालना देणार
१८. डिजीटल टॅक्सी धोरण यंदा चालू करणार.
१९. महसूल वाढीसाठी कॅसिनो शुल्कात २०० टक्के वाढ करणार
|
हा अर्थसंकल्प लोकाभिमुख, आर्थिक दृष्टीने विकासासाठी आवश्यक असा आणि विकसित गोवा डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केला आहे. या अर्थसंकल्पात सगळ्या घटकांचा विचार झालेला आहे. – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत |
पत्रकारांचे निवृत्तीवेतन १० सहस्र रुपयांवरून १५ सहस्र रुपये
अर्थसंकल्पात पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकारांचे निवृत्तीवेतन प्रतिमास १० सहस्र रुपयांवरून १५ सहस्र रुपये केले. पत्रकारांना ‘अटल विमा योजने’चाही लाभ मिळणार.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !